Job Alert: ओला सोडा...! टाटा आपल्या बड्या कंपनीत 45000 महिलांना नोकरी देणार; त्याच चालविणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:49 PM2022-11-02T12:49:27+5:302022-11-02T12:54:59+5:30

टाटा ग्रुप येत्या काळात महिलांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध करणार आहे. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुप मोठी योजना आणत आहे.

टाटा ग्रुप येत्या काळात महिलांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध करणार आहे. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुप मोठी योजना आणत आहे. यानुसार अख्खी कंपनी हजारो महिलांच्या ताब्यात दिली जाणार आहे. तामिळनाडूच्या होसुरमध्ये टाटा आपल्या इलेक्ट्रॉनिक फॅक्टरीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या तयारीला लागले आहेत. या कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्ट्ससह आयफोनचे पार्टही बनविले जातात.

टाटा ग्रुप या कंपनीत येत्या दोन वर्षांत ४५ हजार नवीन नोकऱ्या निर्माण करणार आहे. या कंपनीत आधीच ५००० महिला काम करतात. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये कोरोनाकाळात एकामागोमाग एक असे लॉकडाऊन लावले जात आहेत. सध्या देखील चीनमध्ये कठोर लॉकडाऊन लावला गेला आहे.

अॅप्पलसारख्या कंपन्यांना उत्पादन घेणे कठीण होऊ लागले आहे. यामुळे या कंपन्या भारतात येऊ लागल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच टाटाने अॅप्पल कंपनीशी करार करत आयफोन बनविण्यासाठी डील केली होती. आता अॅप्पलच्या आणखी ऑर्डर स्वीकारण्याची तयारी टाटा ग्रुपने सुरु केली आहे.

यासाठी टाटा मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वाढविण्याच्या तयारीत आहे. या नोकऱ्या खासकरून महिलांसाठी असणार आहेत. टाटाच्या या ५०० एकरावर पसरलेल्या प्लांटमध्ये सध्या १०००० कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये अधिकतर महिला आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात जवळपास ५००० महिलांना नोकरीवर घेण्यात आले होते. या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना 16,000 हून अधिक वेतन दिले जात आहे. याचसोबत जेवण आणि राहण्याची सुविधाही दिली जात आहे.

टाटा ग्रुप आयफोन असेम्बलिंगसाठी Wistronसोबत चर्चा करत आहे. अॅप्पलच्या अटी पूर्ण करण्यासाठी टाटाने कंबर कसली आहे. टाटाने अद्याप होसुरच्या या प्लांटमध्ये भरती करण्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. कोरोनामुळे स्मार्टफोन कंपन्यांसाठी भारत पर्याय दिसू लागला आहे.

फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या आयफोनसाठी काम करणाऱ्या कंपन्या भारतात उत्पादन वाढवू लागल्या आहेत. महिलांच्या हाती संपूर्ण फॅक्टरी देण्याचा प्रयोग ओलाने केला आहे. ओला एस १ स्कूटरची जगातील सर्वात मोठी फॅक्टरीत १० हजार महिला कर्मचारी आहेत.

चीनमध्ये कोरोनाच्या लॉकडाऊननंतर जगातील सर्वात मोठ्या आयफोन प्लांटमध्ये गोंधळ उडाल्याचे धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फॉक्सकॉनच्या झेंगझोऊ शहरातील प्लांटमधून कर्मचारी पायी घरी जाऊ लागले आहेत. यासाठी त्यांनी कंपनीची उंचच्या उंच सुरक्षा भींतीवरून उड्या मारल्या आहेत.