सीएची नोकरी सोडली अन् एक धाडसी निर्णय घेतला; आज कोट्यवधीचं साम्राज्य उभं राहिलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 09:22 IST2024-12-09T09:13:12+5:302024-12-09T09:22:02+5:30

अभ्यासात हुशार, प्रत्येक परीक्षेत अव्वल असणाऱ्या तरुणाने शिक्षण घेत चार्टर्ड अकाऊंटटची पदवी घेतली परंतु त्याचे मन भलतीकडेच गुंतले होते. त्याला जंगलात फिरण्याची आवड होती. त्यातूनच १० वर्षांनी त्याने सीए प्रोफेशनल सोडून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच निर्माण झाली जंगल कॅम्प्स इंडिया कंपनी..आज आपण कॅम्प्स इंडियाचे फाऊंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर गजेंद्र सिंह राठोड यांची यशोगाथा जाणून घेऊया.
जंगल कॅप्स इंडिया कंपनीचा IPO मार्केटमध्ये येतोय, त्याआधीच या कंपनीच्या शेअर्सना ग्रे मार्केटमध्ये १०० टक्क्याहून अधिक प्रिमियम मिळत आहे. जंगल कॅम्प्स इंडियाचे प्रमोटर गजेंद्र सिंह राठोड यांचा जन्म राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात कोटवाद गावात १९६८ साली झाला. त्यांचे वडील बहादूर सिंह हे गावात ठाकूर होते त्याशिवाय राजस्थान सरकारच्या आरोग्य विभागात मलेरिया रोग निरीक्षक होते.
गजेंद्र सिंह यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. १९८४ साली राजस्थान बोर्डातून १० उत्तीर्ण केल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी चुरू येथे गेले. तिथे लोहिया कॉलेजमधून बी.कॉमची पदवी घेतली. १९८८ साली बी कॉम पदवीनंतर त्यांनी चार्टर्ड अकाऊटेंसीच्या शिक्षणासाठी दिल्ली गाठली.
दिल्लीत काही वर्ष मेहनत केल्यानंतर ते सीए परीक्षेत पास झाले. १९९३ साली सीए म्हणून त्यांनी कामालाही सुरुवात केली. मुलाचं शिक्षण आणि नोकरी पूर्ण झाल्यानंतर आई वडिलांनी त्याच्या लग्नाचा विचार केला. गजेंद्र सिंहसोबतही तेच झाले. १९९३ साली ते सीए बनले आणि १९९५ साली त्यांचे लग्न झाले.
लग्नानंतर गजेंद्र सिंह पत्नी लक्ष्मीसह दिल्लीत स्थायिक झाले. सीएच्या शिक्षणासाठी दिल्लीला आलेले गजेंद्र सिंह तिथे कायमचे स्थिरावले. आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू होते परंतु त्यांचं मन भलतीकडेच होते. लहानपणापासून गजेंद्र सिंह यांना जंगलाची आवड होती. या आवडीमुळे ते अनेकदा जंगल सफारी करायचे. योगायोगाने सीए बनल्यानंतर त्यांना पहिला क्लाइंट सापडला ते भरतपूर येथील हेरिटेज हॉटेल सरिस्का पॅलेसचे मालक
या क्लाइंटमुळे ते सरिस्का पॅलेसला येत जात होते. त्यातून त्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर २००२ मध्ये गजेंद्र सिंह राठोड यांनी जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. २००५-०६ मध्ये त्यांनी पहिली प्रॉपर्टी पेंच टायगर रिझर्व्ह परिसरात खरेदी केली.
पेंचमध्ये त्यांनी डिलक्स सफारी कॉटेज, लक्झरी सफारी टेंट, फॅमिली आणि फ्रेंड सूट्स बांधले. याशिवाय स्पा, अली कट्टा डायनिंग हॉल, जीप सफारी आदींचीही व्यवस्था तेथे करण्यात आली होती. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
त्यांनी कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मालमत्ता विकसित केली. यासोबतच ताडोबा व्याघ्र प्रकल्पातच मालमत्ता विकसित करण्यात आली. सध्या कंपनीकडे ५ मालमत्तांमध्ये ८७ खोल्या आहेत.
गजेंद्र सिंह यांचा विवाह लक्ष्मी राठोड यांच्याशी झाला आहे. त्यांना दोन मुलगे आहेत, मोठा यशोवर्धन राठोड आणि धाकटा रणविजय राठोड. दोघेही वडिलांच्या कंपनीत मदत करतात. मोठा मुलगा यशोवर्धन याने स्पेनमधील लेस रोचेस येथून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते कंपनीत पूर्णवेळ संचालक आहेत. त्यांची पत्नी लक्ष्मी राठोड याही कंपनीत संचालक आहेत.
जंगल कॅम्प्स इंडियाच्या IPO ला ग्रे मार्केट किंवा अनलिस्टेड मार्केटमध्ये प्रचंड भाव मिळत आहे. हा एक SME IPO आहे, त्यामुळे एका लॉटमध्ये १६०० शेअर्स ठेवण्यात आले आहेत. म्हणजे यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान १,१५,२०० रुपये गुंतवावे लागतील. ग्रे मार्केटमध्ये, ७२ रुपयांच्या IPO किमतीवर ७५ रुपये प्रीमियम (GMP) मिळत आहे.