भारताशी पंगा घेणाऱ्या ट्रुडोंच्या देशाची वाईट अवस्था; बेरोजगारी शिगेला, कॅनडा मंदीच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 09:06 IST2024-12-14T08:56:55+5:302024-12-14T09:06:08+5:30

Justin Treduea Canada India Relationship: आपल्या मतपेटीच्या राजकारणामुळे भारतासोबतचे संबंध बिघडवणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांनी घेतलेली भूमिका महागात पडत असल्याचं दिसून येतंय.

Justin Treduea, Nijjar Murder Case, Canada India Relationship: आपल्या मतपेटीच्या राजकारणामुळे भारतासोबतचे संबंध बिघडवणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांनी घेतलेली भूमिका महागात पडत असल्याचं दिसून येतंय. कॅनडातील बेरोजगारी नोव्हेंबरमध्ये ६.८ टक्क्यांवर पोहोचली असून सप्टेंबर २०२१ नंतरची ही उच्चांकी पातळी आहे.

गेल्या दोन वर्षांत देशातील बेरोजगारीचा दर १.८ टक्क्यांनी वाढला आहे. या कालावधीत तरुणांच्या बेरोजगारीचा दर ४.६ टक्क्यांनी वाढून १३.९ टक्के झाला आहे. मंदीच्या काळात देशात बेरोजगारी एवढ्या वेगाने कधीच वाढली नव्हती. दरम्यान, बँक ऑफ कॅनडानं नव्या जाहीर केलेल्या धोरणात व्याजदरात ५० बेसिस पॉईंटची कपात केलीये.

बँकेने यंदा पाच वेळा व्याजदरात कपात केली आहे. कॅनडाची अर्थव्यवस्था गेल्या सहा तिमाहींपासून दरडोई आधारावर घसरत आहे. अशा परिस्थितीत कॅनडा मंदीच्या गर्तेत अडकला आहे का? असा प्रश्न पडत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच कॅनडा हे अमेरिकेचे ५१ वे राज्य व्हावे, अशी खिल्ली उडवली होती. कॅनडाचे आर्थिक अस्तित्व अमेरिकेशी खोलवर जोडलेले आहे, हे सत्य आहे. ट्रम्प यांनी कॅनडाच्या वस्तूंवर २५ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली तेव्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना धक्का बसला. त्यानंतर लगेचच त्यांनी ट्रम्प यांना भेटण्यासाठी फ्लोरिडाला धाव घेतली.

अमेरिका हा कॅनडाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. २०२२ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार ९६०.९ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. कॅनडाच्या जागतिक व्यापारात अमेरिकेचा वाटा ६३.४ टक्के आहे.

कॅनडाने २०२२ मध्ये अमेरिकेला ५९८ अब्ज डॉलर्सची निर्यात केली, जी त्याच्या एकूण निर्यातीच्या ७५% आहे. दोन्ही देशांचे संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित नाहीत. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात एकमेकांवर अवलंबून आहेत. अमेरिकेच्या ऊर्जा आयातीत कॅनडाचा वाटा ५१ टक्के आहे.

कॅनेडियन कंपन्यांनी अमेरिकेत ६२० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, तर अमेरिकन कंपन्यांनी कॅनडामध्ये ५५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. दोन कोटींहून अधिक कॅनेडियन नोकऱ्या अमेरिकेबरोबरच्या व्यापारावर अवलंबून आहेत. त्यामुळे अमेरिकेशिवाय कॅनडाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडू शकते.

बँक ऑफ कॅनडाचे माजी गव्हर्नर स्टीफन पोलोझ यांनी देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत असल्याचं म्हटलंय. मोठ्या लोकसंख्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेतील कमकुवतपणा लपला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.