पॅरिसपेक्षा 5 पट; अदानी समूहाने उभारले जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क, पाहा फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 09:25 PM 2024-04-11T21:25:36+5:30 2024-04-11T21:34:02+5:30
कंपनीने 2030 पर्यंत 500 GW वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. Khavda Renewable Energy Park: जगात नैसर्गिक संसाधने फार काळ टिकणार नाहीत. त्यामुळे मानव सातत्याने अशा स्त्रोतांचा शोध घेत आहे, जे भविष्यात त्याला उपयोगी पडतील. याच पार्श्वभूमीवर भारतात जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क (Renewable Energy Park) बांधले जात आहे. गौतम अदानींच्या नेतृत्वातील अदानी समूहाने गुजरातच्या खवरा, कच्छमध्ये हे एनर्जी पार्क उभारले आहे.
1.5 लाख कोटींची गुंतवणूक-देशातील सर्वात मोठी रिन्युएबल एनर्जी कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड गुजरातच्या खवरा, कच्छमध्ये 30 मेगावॅट वीज निर्मितीसाठी सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांनी ही माहिती दिली. जैन म्हणाले, “आम्ही नुकतेच खवरामध्ये 2000 मेगावॅट (दोन गिगावॅट) वीजनिर्मिती सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षात येथे चार गिगावॅट क्षमता आणि त्यानंतर दरवर्षी पाच गिगावॅट क्षमतेची भर घालण्याची आमची योजना आहे. खवरा एनर्जी पार्क आपल्या भविष्यात 81 अब्ज युनिट वीज निर्मिती करेल, जी बेल्जियम, चिली आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांना वीज पुरवण्यासाठी पुरेशी आहे."
पॅरिसपेक्षा पाचपट मोठा-या एनर्जी पार्कची सर्वात विशेष बाब म्हणजे, हा 538 स्क्वेअर किलोमीटर परिसरात पसरलेला एनर्जी पार्क पॅरिस शहरापेक्षा 5 पट मोठा आहे. या एनर्जी पार्कची बाहेरील बाजू पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे. येथे एक हवाई पट्टीदेखील तयार करण्यात आली आहे, जी आठवड्यातून काही वेळा मुंद्रा किंवा अहमदाबाद येथून कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरली जाते.
परिसरात अनेक आव्हाने...-अत्यंत खारट पाण्याच्या या भागात अनेक आव्हाने आहेत. मार्च ते जून या कालावधीत धुळीची वादळे येतात, दळणवळण आणि वाहतूक पायाभूत सुविधा नाहीत, सर्वात जवळचे राहण्यायोग्य ठिकाण सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात जमिनीखाली पाणी मुरत नाही, त्यामुळे येथील भूजलही खारे असते. पण, या आव्हानांना न जुमानता अदानी समूहाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला आहे. 2030 पर्यंत जीवाश्म नसलेल्या स्त्रोतांपासून 500 GW वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या एनर्जी पार्कचे बांधकाम 2022 मध्ये सुरू झाले होते. खवरातील जमीन सरकारच्या मालकीची असून, ती अदानी समूहाला 40 वर्षांच्या लीजवर दिली आहे.