एक अशी जागा की जिथं ठेवण्यात आलंय ४० हजार क्विंटल सोनं; कशी केली जाते सुरक्षा? पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 08:33 PM 2021-07-08T20:33:19+5:30 2021-07-08T20:37:57+5:30
सध्या सोनं खरेदी करायचं म्हटलं तर १० ग्रॅम म्हणजेच एक तोळ्यासाठी ५० हजार रुपये मोजावे लागतात. पण जगात एक अशी जागा आहे की जिथं ४० हजार क्विंटर सोनं ठेवलंय. जाणून घेऊयात... आपल्या घरात १ किलो सोनं जरी असेल तरी आपल्याला सुरक्षेची चिंता सतावते. अनेक जण सोनं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास पसंती देतात किंवा मग त्यासाठी वेगळी तिजोरी बनवून घेतात. पण जगात एक अशी इमारत आहे की जिथं १० किंवा २० नव्हे, तर ४० हजार क्विंटल सोनं म्हणजेच ४० लाख किलो सोनं ठेवण्यात आलं आहे.
जगात एखादी दुर्मिळच व्यक्ती असेल की ज्यानं इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं कधी पाहिलं असेल. पण इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं ठेवण्यात आलेल्या इमारतीची सुरक्षा देखील किती तगडी असेल याचा विचार तुम्ही करू शकता.
अमेरिकेतील फोर्ट नॉक्स ही इमारत जगातील सर्वात सुरक्षित इमारत म्हणून ओळखली जाते. या इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी डिपार्टमेंट ऑफ ट्रेजरीकडे आहे. रिडर डायजेस्टच्या एका अहवालानुसार या इमारतीत यूएस गोल्ड रिझर्व्हचे अर्ध्याहून अधिक सोनं या इमारतीत ठेवण्यात आलं आहे.
सामान्य व्यक्तीला या इमारतीत प्रवेश नाही. इतकंच काय तर इथं सुरक्षेची जबाबदारी पाहणाऱ्यांनाही सोनं ठेवण्यात आलेल्या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही. सोन्याच्या साठ्याभोवती चहुबाजूंनी तारांचं कुंपण आहे.
फोर्ट नॉक्स इमारतीत तब्बल ४० लाख किलो सोन्याचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या सुरक्षेसाठी खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
सुरक्षेबाबत अधिकृत माहिती आजवर जाहीर करण्यात आलेली नसली तरी रिपोर्टनुसार या इमारतीत विद्युत प्रवाह असलेल्या तारांचं कुंपण आहे. याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज विविध मशीन्स सोन्याच्या साठ्यावर लक्ष ठेवून असतात.
रडार, लेझर प्रणालीच्या माध्यमातून संपूर्ण तिजोरी खोल्यांवर नजर ठेवण्यात आली आहे. इमारतीचं प्रवेशद्वार देखील स्टील आणि दगडांनी तयार करण्यात आलं आहे. ज्याचं वजन जवळपास २० टन इतकं असल्याचं सांगितलं जातं.
विशेष म्हणजे, या इमारतीत प्रवेश आणि बाहेर कसं पडायचं याची कुणालाच माहिती देण्यात येत नाही. यासाठी अनेक लोकांची मदत लागते. याशिवाय इमारतीच्या आसपासच्या जमिनीखाली स्फोटकं ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतं. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.