Nominee: तुम्हीही गुंतवणूक किंवा बचतीसाठी नॉमिनी आहात? पाहा, महत्त्व, नियम आणि अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:28 PM2021-10-18T17:28:54+5:302021-10-18T17:34:39+5:30

Nominee: विमा, गुंतवणूक आणि बचतीसाठी कोणाची नॉमिनी म्हणून निवड केली जाऊ शकते? जाणून घ्या, डिटेल्स...

बँकेत बचत खाते उघडताना, विमा पॉलिसी घेताना, शेअर बाजारात गुंतवणूक करताना, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना किंवा प्रॉव्हिडेंट फंडात गुंतवणूक करताना नॉमिनी म्हणजेच नामनिर्देशित व्यक्तीची निवड करावी लागते.

नॉमिनी व्यक्तीची निवड न केल्यास गुंतवणूकदाराचा अपघाती मृत्यू झाला किंवा इतर गोष्टीमुळे त्याला जीव गमवावा लागला, तर त्याची सर्व मेहनत वाया जाते आणि वारसदार किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांना गुंतवणूक किंवा बचत यांचा लाभ घेता येत नाही.

गुंतवणूक किंवा बचतीशी संबंधित कोणत्याही योजनेचा भाग होताना नॉमिनीची निवड करावी लागते. नॉमिनी व्यक्ती फक्त पैसे किंवा मालमत्तेच्या देखभालीसाठी असतो. तो तुमच्या पैशांचा हक्कदार होत नाही. नॉमिनीने तुमच्यानंतर कायदेशीर वारसदाराकडे पैसे सोपवणे आवश्यक असते.

नॉमिनी आणि कायदेशीर वारस एकच असू शकतात. तुम्ही तुमचा आयुष्याचा जोडीदार, तुमची मुले, पालक, कुटुंबातील इतर सदस्य तसेच एखाद्या जवळच्या व्यक्तीला, मित्रालाही नॉमिनी करू शकता.

गुंतवणूक किंवा बचतीसाठी नॉमिनी व्यक्ती नसेल, तर गुंतवणूकदार किंवा मालमत्तेच्या मालकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील इतर सदस्यांना पैसे मिळणे कठीण होते. तसेच एखाद्या व्यक्तीला पैसे किंवा मालमत्ता मिळवण्यासाठी प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते.

नॉमिनी असेल तर हीच प्रक्रिया सोपी होते. सर्व आर्थिक बाबींमध्ये नॉमिनी असणे आवश्यक आहे. विमा पॉलिसीमध्ये, बँक खाते उघडताना आणि गुंतवणुकीच्या वेळी नॉमिनीचे नाव देणे आवश्यक आहे.

विमा घेताना तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी निवडू शकता. तुम्ही तुमची आई किंवा वडील, जोडीदार किंवा मुलांना नॉमिनी करू शकता. बँकेत खाते उघडताना तुम्ही नातेवाईक किंवा मित्रालाही नॉमिनी करू शकता. येथे नॉमिनी व्यक्ती कायदेशीर वारस असेलच असे नाही.

संयुक्त खात्याची रक्कम पहिल्यांदा दुसऱ्या खातेधारकाला आणि नंतर नॉमिनी व्यक्तीला दिली जाते. गुंतवणूक करताना नॉमिनी करणे महत्वाचे आहे.

येथे तुम्ही फक्त एका व्यक्तीचेच नॉमिनी करू शकतात. तर म्युच्युअल फंडात तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडू शकता, असे सांगितले जाते.

नॉमिनी देणे अतिशय महत्त्वाचे असून, संबंधित संस्था, कंपन्या यांचे नॉमिनी संदर्भातील नियम वाचणे, ते समजून घेणे आणि त्याप्रमाणे योग्य त्या नॉमिनीची निवड करणे योग्य ठरते, असे सांगितले जाते.