बचत खात्यावर कोणती बँक देते सर्वाधिक व्याज? जाणून घ्या १० बँकांचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 07:40 PM 2021-07-06T19:40:46+5:30 2021-07-06T19:50:23+5:30
बँकेत तुमचं खातं असेल आणि त्यात तुम्ही ठेवत असलेल्या रकमेवर बँक तुम्हाला ठरावीत व्याज देतं हे तर तुम्हाला माहित असेलच. पण सर्वाधिक व्याज नेमकी कोणती बँक देते? जेणेकरुन ग्राहकांचा फायदा होईल हे आपण जाणून घेऊयात... बँकेत विविध प्रकारची खाती ग्राहकाला उघडता येतात. पण बचत खात्यावर मिळणारं व्याज कमी असलं तरी सर्वसामान्य माणसासाठी बजत खातं देखील अतिशय महत्वाचं ठरतं. त्यामुळे नेमकी कोणती बँक बजत खात्यावर सर्वाधिक व्याज देते हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
बँकेत खातं उघडण्याआधी संबंधित बँक तुम्हाला किती व्याज देणार आहे. कोणत्या सुविधा देणार आहे याची माहिती घेणं अतिशय महत्वाचं असतं. त्यानंतरच निर्णय घ्यावा. कारण बँकेत खातं उघडणं आता अतिशय सोपं झालं आहे. तुम्हाला अगदी ऑनलाइन पद्धतीनं देखील खातं सुरू करण्याची सुविधा काही बँकांनी उपलब्ध करुन दिली आहे.
सध्या तीन पद्धतीच्या बँकांमध्ये सर्वाधिक बचत खाती उघडली जात आहेत. यात खासगी बँका, सरकारी आणि स्मॉल फायनान्स बँकांचा समावेश आहे. खरंतर स्मॉल फायनान्स बँका बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देतात. पण सुरक्षेच्या कारणास्तव लोक स्मॉल फायनान्स बँकांमध्ये खातं उघडण्यास पसंती देत नाहीत.
खासगी बँकांचं म्हणायचं झालं तर डीसीबी बँक ३ ते ६.७५ टक्क्यांपर्यंतचं व्याज ग्राहकांना देते. तर आरबीएल बँक बचत खात्यावर ४.२५ ते ६.२५ टक्क्यांचं व्याज देते.
बंधन बँक ३ ते ६ टक्के, इंडसइंड बँक ४ ते ५.५ टक्के आणि यस बँक ४ ते ५.२५ टक्क्यांचं व्याज देते.
सरकारी बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक ३ ते ३.५ टक्के, आयडीबीआय बँक ३ ते ३.४ टक्के, कॅनरा बँक २.९० ते ३.२० टक्के, बँक ऑफ बडोदा २.७५ ते ३.२० टक्के आणि पंजाब सिंध बँक ३.१० टक्के व्याज देत आहेत.
सर्वात जास्त व्याज देणाऱ्या लोकप्रिय स्मॉल फायनान्स बँकांमध्ये ५ ते ७.२५ टक्क्यांमध्ये व्याज मिळत. यात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ४ ते ७ टक्के, एयू स्मॉल फायनान्स बँक ३.५ ते ७ टक्के व्याज देते.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ३.५ टक्के ते ७ टक्के आणि जना स्मॉल फायनान्स बँक ३ ते ६.७५ टक्के व्याज बजत खात्यावर देत आहे.