कठोर मेहनत, Nykaa च्या फाल्गुनी नायर ठरल्या भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला; संपत्ती ९६३% वाढली By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 10:24 AM 2022-07-28T10:24:49+5:30 2022-07-28T10:43:47+5:30
Nykaa च्या फाल्गुनी नायर यांनी बायोकॉनच्या किरण मजूमदार शॉ यांना मागे टाकलं. Nykaa Falguni Nayar : नायकाच्या बॉस फाल्गुनी नायर भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला ठरल्या आहेत. त्यांनी बायोकॉनच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किरण मजूमदार शॉ यांना मागे टाकलं आहे.
कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून लिडिंग वेल्दी वुमन लिस्ट २०२१ नुसार नायकाच्या फाल्गुनी नायर यांची एकूण संपत्ती ५७,५२० कोटी रूपये आहे. नायकाच्या लिस्टिंगमुळे त्यांच्या संपत्तीत ९६३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
फाल्गुनी नायर भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला ठरल्या असून त्या जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावर आहेत. नायकाचा आयपीओ २०२० मध्ये आला होता. हा पहिला भारतीय युनिकॉर्न आहे ज्याचं नेतृत्व महिला करत आहे.
HCL टेकच्या चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा ८४,३३० कोटी रूपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून लिडिंग वेल्दी वुमन लिस्टच्या तिसऱ्या एडिशननुसार नाडर या सलग दुसऱ्या वर्षी सर्वात श्रीमंत महिला म्हणून स्थान टिकवून आहेत. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच्या संपत्तीवरुन ही यादी तयार करण्यात आली आहे.
या यादीत त्या श्रीमंत महिलांना स्थान देण्यात आलं आहे ज्यांनी कॉर्पोरेट जगतात आपलं नाव आपल्याच मेहनतीच्या जोरावर मोठं केलं आहे. या यादीत २५ नव्या चेहऱ्यांनाही स्थान मिळालं आहे. यासाठी ३०० कोटी रूपयांपर्यंतचं कट ऑफ निश्चित करण्यात आलं होतं. २०२० मध्ये ही मर्यादा १०० कोटी होती
रिपोर्टची अन्य एक विशेष बाब म्हणजे २०२१ मध्ये महिलांची सरासरी संपत्ती वाढून ४१७० कोटी रूपये झाले आहे. गेल्या एडिशनमध्ये ही आकडेवारी २७२५ कोटी रूपये होती. याशिवाय जेटसेटगोच्या ३३ वर्षिय कनिका टेकरीवाल या यादीतील सर्वात तरूण सेल्फ मेड महिला ठरल्या आहेत. २० महिलांपैकी ९ महिलांचं वय हे ४० वर्षांपेक्षाही कमी आहे.
सेक्टर्सबद्दल सांगायचं झालं तर या यादीत १२ महिला फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील होत्या. यानंतर ११ महिला हेल्थकेअर आणि ९ महिला कंज्युमर गुड्स या क्षेतातून होत्या.