कधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक

By बाळकृष्ण परब | Published: September 30, 2020 02:46 PM2020-09-30T14:46:26+5:302020-09-30T14:54:23+5:30

आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट २०२० मध्ये लक्ष्मणदास मित्तल १६४ व्या क्रमांकावर आहेत.

आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट २०२० मध्ये अनेक भारतीय उद्योगपतींना स्थान मिळाले आहे. मात्र यापैकी एक नाव सर्वात आश्चर्यकारक आहे. यावेळी सोनालिका ट्रॅक्टरचे मालक लक्ष्मणदास मित्तल यांना श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट २०२० मध्ये लक्ष्मणदास मित्तल १६४ व्या क्रमांकावर आहेत. या यादीमध्ये १ हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तींना स्थान दिले जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहेत. मुकेश अंबानींची एकूण संपत्ती सहा लाख, ५८ हजार ४०० कोटी एवढी आहे.

२०२० हुरून इंडिया रिच लिस्ट एडिशनमध्ये एकूण ८२८ भारतीयांना स्थान मिळाले आहे. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर हिंदुजा ब्रदर्स आहेत. हिंदुजा ब्रदर्सची एकूण संपत्ती ही एक लाख ४३ हजार ७०० कोटी रुपये एवढी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर १ लाख ४१ हजार ७०० कोटींच्या संपत्तीसह एचसीएलचे संस्थापक शिव नाडर हे आहेत.

उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंबीय या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती १ लाख ४० हजार २०० कोटी रुपये एवढी आहे. तर विप्रोचे अझिम प्रेमजी पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १ लाख १४ हजार ४०० कोटी रुपये आहे.

सोनालिका ग्रुपचे चेअरमन लक्ष्मण दास मित्तल देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १६४ व्या क्रमांकावर आहेत. ८९ वर्षीय लक्ष्मणदास मित्तल यांनी जीवनात अत्यंत खडतर परिस्थितीतून मार्गाक्रमण केले आहे. पंजाबमधील होशियारपूर येथे राहणाऱ्या मित्तल यांनी १९६२ मध्ये थ्रेसर बनवण्यापासून सुरुवात केली होती. त्यापूर्वी त्यांनी एलआयसी एजंट म्हणूनही काम केले होते.

पहिल्यांदा थ्रेसर बनवण्याचा व्यवसाय चालला नाही. त्यामुळे व्यवसाय नुकसानीत जात असल्याकारणाने लक्ष्मणदास यांनी एकदा वडलांना रडताना पाहिले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा थ्रेसर बनवण्याचे काम सुरू केले आणि पुढे जाऊन त्यांनी सोनालिका ग्रुपची पायाभरणी केली.

आज सोनालिका ग्रुप भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर निर्माता कंपनी आहे.