Lalit Modi Networth : 12 वर्षाआधी फरार झाला होता ललित मोदी, भारतात अजूनही मोठं उद्योग साम्राज्य By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 03:10 PM 2022-07-15T15:10:54+5:30 2022-07-15T15:21:01+5:30
Lalit Modi Networth : बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की, ललित मोदी हा एका मोठ्या कार्पोरेट घरातून येतो आणि अजूनही त्याचं बिझनेसचं मोठं साम्राज्य भारतासहीत अनेक देशात पसरलं आहे. आयपीएलची सुरूवात करणारा ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याची चर्चा बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनसोबतच्या अफेअरमुळे होत आहे. ललित मोदीने स्वत: सोशल मीडियावर सुश्मिता सेनसोबतचे फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची माहिती दिली.
मात्र, बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की, ललित मोदी हा एका मोठ्या कार्पोरेट घरातून येतो आणि अजूनही त्याचं बिझनेसचं मोठं साम्राज्य भारतासहीत अनेक देशात पसरलं आहे. त्याच्या बिझनेसमध्ये दारू, सिगारेट आणि पान मसाल्यासोबतच रिटेल स्टोर, रेस्टॉरन्ट चेन, ट्रॅव्हल कंपनीचा समावेश आहे.
ललित मोदीचे आजोबा राय बहादूर गुजरमल मोदी हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध बिझनेसमन होते. मोदी समूहाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, गुजरमल मोदी यांनी 1933 मध्ये एक साखरेची मिल लावून बिझनेसला सुरूवात केली होती. हळूहळू त्यांचा उद्योग वाढला आणि मोदी एंटरप्रायजेस उभी राहिली. ललित मोदीचे आजोबा गुजरमल मोदी यांनी उत्तर प्रदेश मेरठमध्ये औद्योगिक शहर मोदीनगर वसवलं होतं.
ललित मोदीचे वडील केके मोदी आठ भाऊ-बहिणींमध्ये सर्वात मोठे होते. गुजरमल मोदी यांच्यानंतर एंटरप्रायजेसची कमान केके मोदी यांच्या हाती आली. केके मोदी यांनी पारंपारिक बिझनेसमध्ये इतरही गोष्टींचा समावेश केला.
आता मोदी एंटरप्रायजेसचा बिझनेस अॅग्रो, स्पेशियालिटी अॅन्ड परफॉर्मन्स केमिकल्स, तंबाखू, पान मलासा, माउथ फ्रेशनर्स, कन्फेक्शनरी, रिटेल, एज्युकेशन, कॉस्मेटिक, एंटरटेन्मेंट, फॅशन, ट्रॅव्हल आणि रेस्टॉरन्ट असा वाढला. मोदी एंटरप्रायजेस आता 1.5 बिलियन डॉलरपेक्षा जास्त व्हॅल्यू असलेला कॉर्पोरेट ग्रुप आहे.
ललित मोदीच्या पर्सनल वेबसाइट आणि ट्विटर-फेसबुकवरील माहितीनुसार, तो आताही मोदी एंटरप्रायजेसचा प्रेसिडेंट आहे. मोदी एंटरप्रायजेसच्या फेमस ब्रॅन्ड्समध्ये रॉकफोर्ड व्हिस्की, मार्लबोरो सिगारेट, पान विलास पान मसाला, बीकन ट्रॅव्हल कंपनी, 24 सेवन रिटेल स्टोर, मोदी केअर, इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड इत्यादींचा समावेश आहे.
कंपनी दिल्लीत ईगो थाय, ईगो इटालियन, ईगो 33 सारखी रेस्टॉरन्ट चेन चालवते. ललित मोदीची कंपनी मोदी एंटरप्रायजेस भारातसोबतच, अरब देशांमध्ये, आफ्रिकेत आणि यूरोपमध्ये बिझनेस करते.
ललित मोदीला सध्या भारतात फरार घोषित करण्यात आलं आहे. ललित मोदीला आयपीएल लीग सुरू झाल्यावर दोन वर्षात 2010 मध्ये देश सोडून पळावं लागलं होतं. त्याच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप होता. तो आता ब्रिटनची राजधानी लंडनच्या स्लोएन स्ट्रीटवर एका लक्झरी मेंशनमध्ये राहतो. ही 5 मजली बिल्डींग आहे आणि 7 हजार स्क्वेअर फूट परिसरात आहे.
ललित मोदीच्या नेटवर्थबाबत सांगायचं तर त्याची सध्याची संपत्ती साधारण 570 मिलियन डॉलर सांगितली जाते. याचा अर्थ भारतीय करन्सीनुसार ललित मोदीची एकूण संपत्ती साधारण 4,555 कोटी रूपये इतकी आहे.