ललित मोदीची मुलगी आलिया व्यवसायात आजमावतेय नशिब; माहितीये कोणत्या कंपनीची आहे मालकीण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 08:43 AM2024-07-03T08:43:25+5:302024-07-03T09:03:51+5:30

Lalit Modi Daughter Aliya Modi : काही वर्षांपूर्वी देशसोडून पळून गेलेल्या ललित मोदीची मुलगी आलिया सध्या उद्योग जगतात आपलं नशिब आजमावत आहे.

Lalit Modi Daughter Aliya Modi : काही वर्षांपूर्वी देशसोडून पळून गेलेल्या ललित मोदीची मुलगी आलिया सध्या उद्योग जगतात आपलं नशिब आजमावत आहे. आलिया मोदीनं मे २०२२ मध्ये विवाह केला होता. असं असलं तरी आलियाचं पूर्ण लक्ष तिच्या बिझनेसवर आहे. बोस्टन आणि लंडनमधून मजबूत अॅकॅडमिक पार्श्वभूमी असलेली आलिया सध्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे.

आलियानं लंडनमध्ये एएमआरएम कन्सल्टंट्स लिमिटेडची स्थापना केली होती. ही वेगाने वाढणारी इंटिरिअर डिझाइन कंपनी आहे. कंपनीचं मूल्यांकन १० लाख डॉलर्स (सुमारे ८ कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. ही वेगळी बाब आहे की, आलियाचं नेटवर्थ ५० लाख डॉलर्स (जवळपास ४१ कोटी रुपये) पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

ललित मोदीची कन्या आलिया मोदीनं उद्योग जगतात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा जन्म १९९३ मध्ये झाला. आलियानं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटिरिअर डिझाइनमध्ये करिअरला सुरुवात केली. लंडनमध्ये एएमआरएम इंटरनॅशनल कन्सल्टंट्स लिमिटेड ही स्वतःची कंपनी स्थापन केली. मे २०२२ मध्ये तिनं ब्रेट कार्लसनशी विवाह केला.

ललित मोदीवर आयपीएलचं अध्यक्षपद असताना आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. यानंतर त्यानं भारत सोडला. त्याला फरार घोषित करण्यात आलं. मात्र, आलियानं यातून पुढे जात आपला व्यवसाय सुरू केला. तिनं आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आलियानं अमेरिकेतील ब्रँडिस विद्यापीठातून आर्ट हिस्ट्रीमध्ये बॅचलर ऑफ सायन्सची पदवी घेतली आहे. लंडनच्या इंचबाल्ड स्कूल ऑफ डिझाइनमधून आर्किटेक्चरल इंटिरिअर डिझाइनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने दारा हुआंग यांच्या आर्किटेक्चर फर्म डिझाइन हाऊस लिबर्टीमध्ये दोन वर्ष काम केलं.

या अनुभवामुळे तिला इंटिरिअर डिझाईनच्या जगातील बारकावे समजण्यास मदत झाली. २०१८ मध्ये कॅन्सरमुळे आई मीनल मोदी यांचं निधन झाल्यानंतर आलियानं आपल्या करिअरमध्ये स्वत:ला अधिक झोकून दिलं. तिनं स्वत:ची इंटिरिअर डिझाइन कंपनी स्थापन केली जी आज लंडनमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. कंपनी इंटिरिअर डिझाइनसह डिझाइन कन्सल्टन्सी सेवा देखील प्रदान करते.

मे २०२२ मध्ये आलियानं व्हेनिसमध्ये एका भव्य समारंभात ब्रेट कार्लसनसोबत विवाह केला. हा विवाह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. आलियाचा भाऊ रुचिर मोदी देखील भारतातील प्रसिद्ध युवा उद्योजकांपैकी एक आहे.

गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड, मोदी एंटरप्रायजेस, केके मोदी ग्रुप आणि मोदी केअर सारख्या अनेक यशस्वी व्यवसायांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. याशिवाय ते मोदी व्हेन्चर्सचे संस्थापक आणि सीईओ देखील आहेत. जुलै २०२२ पर्यंत ललित मोदीची एकूण संपत्ती ४,५५५ कोटी रुपये होती.