LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 09:10 AM2024-11-26T09:10:32+5:302024-11-26T09:25:14+5:30

LIC Investment Stocks : एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत ८४ शेअर्समधील गुंतवणूक कमी केली आहे. त्यांनी ७ कंपन्यांमधील आपली गुंतवणूक पूर्णपणे बंद केली. पाहा कोणते आहेत हे शेअर्स.

LIC Investments : एलआयसीनं सप्टेंबर तिमाहीत आपल्या पोर्टफोलिओतील २८५ पैकी ७५ शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे. या काळात त्यांनी ७ नवीन शेअर्समध्येही गुंतवणूक केली. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने दुसऱ्या तिमाहीत जवळपार ५६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

विशेष म्हणजे त्यांनी लार्जकॅप शेअर्समध्ये जवळपास ५० टक्के गुंतवणूक केली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीनं सुमारे ३८,००० कोटी रुपयांची विक्री केली आहे. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीत त्याची निव्वळ खरेदी १८,००० कोटी रुपये झाली. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे.

एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत ८४ शेअर्समधील गुंतवणूक कमी केली आहे. त्यांनी ७ कंपन्यांमधील आपली गुंतवणूक पूर्णपणे बंद केली. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये २८५ कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यांचे एकूण मूल्य १६.७६ लाख कोटी रुपये आहे. जून तिमाहीत एलआयसीच्या पोर्टफोलिओचे एकूण मूल्य १५.७२ लाख कोटी रुपये होते. ही माहिती प्राइमडेटाबेसच्या डेटावर आधारित आहे.

एलआयसीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचे मूल्य सप्टेंबर तिमाहीत वाढले. सप्टेंबर तिमाहीत देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही भारतीय बाजारात चांगली खरेदी केली. या कालावधीत परदेशी गुंतवणूकदारांनी ८८ हजार ५४९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १.०४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या काळात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ७-७ टक्क्यांची वाढ दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक ७ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ९.६ टक्क्यांनी वधारला.

देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीनं सप्टेंबर तिमाहीत अनेक ब्लू-चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. यामध्ये एल अँड टी, मारुती सुझुकी आणि बजाज फायनान्सचा समावेश होता. याशिवाय त्यांनी इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्येही गुंतवणूक केली. एलआयसीनं ज्या कंपन्यांचे शेअर्स विकले त्यात ल्युपिन, एनटीपीसी, एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट यांचा समावेश आहे.

एलआयसीनं आपल्या पोर्टफोलिओच्या डायव्हर्सिफिकेशनवर सप्टेंबर तिमाहीत गुंतवणूक केली. सायंट, श्याम मेटॅलिक्स, सनोफी कन्झ्युमर, श्रीराम फायनान्स, आयडीएफसी फर्स्ट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बीईएलच्या शेअर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली. या शेअर्समध्ये सुमारे ८,५६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दीपक फर्टिलायझर्स, सदर्न पेट्रोकेमिकल्स, सुमितोमो या कंपन्यांमधील हिस्सा कमी केला.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)