LIC IPO मध्ये गुंतवणूकदारांचं नुकसान का झालं? आता पुढं काय करावं? सरकारनं दिलं स्पष्टीकरण... By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:21 AM 2022-05-18T11:21:22+5:30 2022-05-18T11:27:05+5:30
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओनं काल गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला. आयपीओ लिस्ट होताच अनेकांचे पैसे बुडाले. देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरलेल्या LIC मध्ये गुंतवणूदार का बुडाले? वाचा... एलआयसीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला. एलआयसीच्या आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणात पॉलिसी धारकांनीही पैसे लावगेल होते. पण सर्वांनाच नुकसान सोसावं लागलं आहे. विशेष म्हणजे आयपीओमध्ये पहिल्यांदाच नशीब आजमावणाऱ्यांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश होता.
आयपीओ लिस्टिंगवेळी झालेल्या नुकसानीनंतर गुंतवणूकदार चिंतेत होते. नेमकं काय झालं आणि एवढ्या मोठ्या आयपीओमध्ये पैसे कसे काय बुडाले असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसंच आता नुकसानीतून सावरण्यासाठी काय करावं असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.
एलआयसी कंपनीवर देशातील नागरिकांना मोठा विश्वास आहे. असं असतानाही आयपीओनं गटांगळी खाल्ली या संभ्रमात सर्वजण आहेत. गुंतवणूकदारांना फायदा व्हावा यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले गेले होते. पण आतापर्यंत तरी तसं काही झालेलं दिसत नाही.
सरकारनं एलआयसीच्या शेअरच्या कमकुवत लिस्टिंगसाठी शेअर बाजाराला जबाबदार धरलं आहे. बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे असं सरकारचं म्हणणं आहे.
डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट्स मॅनेजमेंटचे सेक्रेटरी तुहिन कांत पांडे यांच्या म्हणण्यानुसार शेअरच्या कमकुवत लिस्टिंगमागे शेअर मार्केटच्या अनिश्चिततेचं प्रमुख कारण आहे. एलआयसीचे शेअर दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून गुंतवणूदारांनी स्वत:जवळ ठेवावेत असा सल्ला सरकारनं दिला आहे.
पॉलिसीधारक, किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना डिस्काऊंटमध्ये शेअर मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना इतरांच्या तुलनेत कमी नुकसान झालं आहे. कंपनीनं ९४९ रुपये प्रति शेअरच्या भावानं गुंतवणूकदारांना शेअर्स अलॉट केले होते.
आगामी काळात तेजीची शक्यता शेअर लिस्टिंगच्या मुहूर्तावर एलआयसीचे चेअरमन एम.आर.कुमार यांनी म्हटलं होतं की एलआयसीच्या शेअर्सना चांगला प्रतिसाद मिळेल. बाजारात सध्या पडझड आहे. पण पुढे जाऊन एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी आल्याचं पाहायला मिळेल. शेअर कमकुवत राहील असं कोणतंही कारण सध्या दिसून येत नाही, असंही ते म्हणाले.
एलआयसीचा आयपीओ काल खुल्या बाजारात लिस्ट झाल्यानंतर जवळपास ९ टक्क्यांनी शेअर कोसळून ८६७ वर एलआयसीचा शेअर आला होता. तज्ज्ञांच्या मतानुसार बाजारात सुधारणा पाहायला मिळाल्यास एलआयसीचे शेअर देखील तेजी पाहायला मिळेल. पण त्यासाठी गुंतवणूकदारांना थोडी वाट पाहावी लागेल.
दुसरीकडे ग्लोबल ब्रोकरेज फर्म Macquarie नं न्यूट्रल रेटिंगसह LIC च्या शेअर्सचं टार्गेट १ हजार रुपयांपर्यंत व्यक्त केलं आहे. त्यामुळे आगामी काळात एलआयसीच्या शेअरमध्ये जवळपास १२ टक्क्यांची तेजी पाहायला मिळू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.