एलआयसी आयपीओबद्दल सर्वात मोठी अपडेट; केव्हा येणार? तारीख समोर आली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:49 PM2022-04-12T16:49:10+5:302022-04-12T16:53:01+5:30

एलआयसीच्या आयपीओकडे अनेक गुंतवणूकदार डोळे लावून बसले आहेत...

गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत आहेत. गेल्या आर्थिक वर्षातच आयपीओ येईल असं वाटत होतं. मात्र युक्रेन युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर झाला. त्यामुळे सरकारनं आस्तेकदम धोरण स्वीकारलं.

झी बिझनेसनं दिलेल्या वृत्तानुसार, एलआयसी २५ ते २९ एप्रिल दरम्यान आयपीओची घोषणा करू शकते. एलआयसी उद्या सेबीकडे UDRHP (अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) फाईल करण्याची शक्यता आहे. झी बिझनेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

मार्च महिन्यात सरकारकडून एलआयसीचा आयपीओ आणला जाणार होता. मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाली. त्याचे परिणाम जगभरातील शेअर बाजारांत दिसले. त्यामुळे सरकारनं निर्णय बदलला.

आता शेअर बाजारातील स्थिती चांगली आहे. त्यामुळे सरकार लवकरच आयपीओ आणेल. या माध्यमातून एलआयसीमधील ५ ते ६.५ टक्के हिस्सा सरकार विकू शकेल. त्यातून ५० हजार ते ६० हजार कोटी रुपये मिळतील असा सरकारचा अंदाज आहे.

एलआयसीचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ असेल. सरकारनं यंदा निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ७८ हजार कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. एलआयसीच्या आयपीओमुळे हे लक्ष्य गाठणं सोपं होईल.

एलआयसीनं फेब्रुवारीत सेबीकडे मसुदा सादर केला होता. त्यानुसार एलआयसी ६३२ कोटी शेअरपैकी ३१ कोटी ६२ लाख, ४९ हजार ८८५ इक्विटी शेअर विकेल. सेबीच्या मंजुरीनंतर आयपीओ १२ महिने वैध असेल.

एलआयसीचे पॉलिसी धारक आणि कंपनीचे कर्मचारी यांच्यासाठी आयपीओमध्ये राखीव हिस्सा ठेवण्यात आला आहे. दोघांनाही सवलत मिळेल. एकूण इश्यूच्या १० टक्के हिस्सा पॉलिसी धारकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

एलआयसी विमा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचा बाजारातील हिस्सा ६४.१ टक्के इतका आहे. लाईफ इंश्युरन्स प्रीमियमच्या बाबतीत एलआयसी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे.