एक-दोन नव्हे...LIC ने लॉन्च केल्या 4 नवीन विमा पॉलिसी, जाणून घ्या फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 07:36 PM2024-08-07T19:36:30+5:302024-08-07T19:44:22+5:30

या पॉलिसींचा सर्वाधिक फायदा देशातील तरुणांना होईल.

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने एक, दोन नव्हे, तर 4 नवीन विमा योजना लॉन्च केल्या आहेत. विशेष म्हणजे, या सर्व मुदत विमा योजना असून, त्यात कर्जाची सुविधादेखील मिळते. LIC च्या या योजना खास देशातील तरुणांना डोळ्यासमोर ठेवून तयार केल्या गेल्या आहेत.

LIC च्या या 4 योजनांची नावे LIC Yuva Term, LIC Digi Term, LIC Yuva Credit Life आणि LIC Digi Credit Life अशी आहेत. हे प्लॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.

LIC Yuva Term आणि LIC Digi Term- या दोन्ही विमा योजना सारख्याच आहेत. त्यापैकी फक्त एक ऑफलाइन ग्राहकांसाठी आणि एक ऑनलाइन ग्राहकांसाठी आहे. ही एक नॉन-लिंक्ड, पर्सनल, प्युअर रिस्क योजना आहे. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सर्व रक्कम कुटुंबाला मिळते. या प्लॅनमध्ये किमान 50 लाख रुपयांचा विमा दिला जाऊ शकतो.

50 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतचा विमा 1 लाख रुपयांच्या पटीत, 75 लाख ते 1.5 कोटी रुपयांचा विमा 25 लाखांच्या पटीत, 1.5 कोटी ते 4 कोटी रुपयांपर्यंतचा विमा 50 लाख रुपयांच्या पटीत करता येतो. तुम्हाला 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त विमा घ्यायचा असल्यास, तो 1 कोटी रुपयांच्या पटीत असेल.

या विम्यामध्ये तुम्ही सिंगल प्रीमियम पेमेंटचा लाभ देखील घेऊ शकता. सिंगल प्रीमियम पेमेंटच्या बाबतीत मृत्यू लाभ 125% असेल. इतर पर्यायांमध्ये तुम्हाला अघोषित प्रीमियमच्या 7 पट किंवा मृत्यूच्या वेळी भरलेल्या प्रीमियमच्या 105% पर्यंत परतावा मिळेल. या विम्यासाठी किमान वय 18 ते 45 वर्षे आहे, तर मॅच्युरिटी 33 ते 75 वर्षे आहे.

LIC Yuva Credit Life आणि LIC Digi Credit Life- या दोन्ही पॉलिसी सारख्याच आहेत. ऑफलाइन आणि ऑनलाइन ग्राहकांसाठी त्यांची नावे वेगळी ठेवण्यात आली आहेत. या दोन्ही पॉलिसी नॉन-लिंक्ड, पर्सनल, प्युअर रिस्क योजना आहेत. या पॉलिसीसाठी विमा रक्कम किमान रु. 50 लाखांपासून सुरू होते.

ही योजना घेण्यासाठी किमान वय 18 ते 45 वर्षे आहे, तर मॅच्युरिटी पीरियज 23 ते 75 वर्षे आहे. महिलांना प्रीमियम भरण्यासाठी विशेष सवलत मिळते. ही योजना तुमच्या होम, एज्युकेश आणि वाहन कर्जांवर कव्हर देते. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला आणि त्याच्यावर कर्ज असेल, तर पॉलिसीमधून तुमचे कर्ज फेडले जाते.