LIC चे फर्मान! IPO बद्दल कर्मचारी-एजंटना काहीही न बोलण्याची दिली सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 12:01 PM2021-09-13T12:01:51+5:302021-09-13T12:07:21+5:30

चालु आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत LIC चा IPO येणार असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून LIC च्या IPO बाबत अनेक गोष्टींची चर्चा केली जात आहे. चालु आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत LIC चा IPO येणार असल्याचे सांगितले जात आहे.

अशातच आता LIC ने कर्मचारी, एजंट यांच्यासाठी एक फर्मान काढले असून, IPO बाबत कोणतीही वाच्यता न करण्याची ताकीद दिली आहे. एलआयसीच्या आयपीओबाबत कर्मचारी, एजंट यांनी सार्वजनिक स्वरुपात कोणतीही विधाने करू नये, अशा सूचना जारी केल्याची माहिती मिळाली आहे.

LIC म्हटले आहे की, IPO बाबत मीडियामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती देण्याची परवानगी केवळ चेअरमन एमआर कुमार आणि चार संचालक एमके गुप्ता, राजकुमार, सिद्धार्थमोहंती, मिनी आयपे यांनाच आहे.

अन्य कोणतेही अधिकारी, कर्मचारी, एजंट यांना LIC च्या IPO ची शेअर मार्केटमध्ये सादर केली तारीख, मूल्यनिर्धारण, शेअरची किंमत याविषयी सार्वजनिक स्वरुपात माहिती देण्याची परवानगी नाही, असे फर्मान काढण्यात आले आहे.

तसेच एजंट मिटींग, कस्टमर मिटींग, पब्लिक फंक्शन किंवा पब्लिक फोरम अशा कोणत्याही ठिकाणी LIC च्या IPO बाबत चर्चा करू नये, अशीही सूचना देण्यात आली आहे. एवढचे नव्हे, तर अधिकारी, कर्मचारी, एजंट यांनी सोशल मीडियावरही याबाबत कोणत्याही पद्धतीची पोस्ट शेअर करू नये, असेही सांगितले गेले आहे.

कंपनीने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आताच्या घडीला देशभरात LIC चे सुमारे १३.५ लाख एजंट, तर एक लाखाहून अधिक कर्मचारी आहेत. तर, २० खासगी कंपन्यांमधील LIC ला सेवा देणारे ११ लाख एजंट आहेत, असे सांगितले जाते.

दरम्यान, देशातील सर्वात मोठी विमा LIC च्या मेगा IPOचे नियोजन करण्यासाठी सरकारने गोल्डमॅन सॅक्स (इंडिया), सिटीग्रुप ग्लोबल मार्केट इंडिया आणि नोमुरा फायनान्शिअल एडवायझरी ऍंड सेक्योरिटीज इंडियासह 10 मर्चंट बँकर्सला नियुक्त केले आहे.

निर्गुंतवणूक विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या सर्कुलरनुसार, या बँकर्सशिवाय एसबीआय कॅपिटल मार्केट, जेएम फायनान्शिअल, एक्सिस कॅपिलट, बोफा सेक्योरिटीज, जेपी मार्गन इंडिया, आयसीआयसीआय सेक्योरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड सहभागी आहे.

निर्गुतवणूक विभागाने १५ जुलै रोजी मर्चंट बॅंकर्सची नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर १६ मर्चंट बँकर्सने LIC ची लिस्टिंग आणि निर्गुतवणूकीचे नियोजन करण्यासाठी सादरीकरण दिले आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन विभागाची भागीदारी विक्रीसाठी कायदेशीर सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. एक्चुरिअल फर्म मिलमॅन एडवायजर्स एलएलपी इंडियाला आयपीओ एलआयसीच्या एम्बेडेड मूल्याचे आकलन करण्यासाठी याआधीच नियुक्त करण्यात आले आहे. हे मूल्यांकन जानेवारी - मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.