LICने प्लान बदलला! १ हजार भरा अन् दरमहा ११ हजार मिळवा; तुम्हीही घेतलीय का हीच पॉलिसी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 09:09 AM2023-01-10T09:09:23+5:302023-01-10T09:14:42+5:30

LIC ने आपल्या पॉलिसीत बदल केला असून, यामुळे पॉलिसीधारकांचा फायदाच होणार असल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स...

भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वांत मोठी आणि आघाडीची कंपनी आहे. देशातील कोट्यवधी लोकांनी LIC च्या विविध प्रकारच्या पॉलिसी घेतल्या आहेत. पॉलिसींमधील वैविध्य आणि काळानुरुन योजना हे LIC च्या पॉलिसीची वैशिष्ट्ये असल्यामुळे इतक्या वर्षांनंतरही एलआयसीवरील देशवासीयांचा विश्वास कमी झालेला नाही.

यातच एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. LIC ने आपल्या एका पॉलिसीमध्ये बदल केला आहे. याचा फायदा फक्त त्या पॉलिसीधारकांनाच मिळणार आहे, ज्यांनी ५ जानेवारी किंवा त्यानंतर प्लॅन घेतला आहे. एलआयसीने एका निवेदनाद्वारे या प्लॅनमधील बदलाची माहिती दिली आहे.

LIC ने प्लानमध्ये बदल केलेल्या पॉलिसीचे नाव LIC New Jeevan Shanti Scheme Plan आहे. LIC) ने त्यांच्या नवीन जीवन शांती योजनेसाठी वार्षिक दरांमध्ये सुधारणा केल्या आहेत. आता पॉलिसीधारकांना या योजनेअंतर्गत अधिक वार्षिक रक्कम मिळू शकते.

LICच्या पॉलिसीधारकांना १ हजार रुपयांच्या खरेदी किमतीवर ३ ते ९.७५ रुपयांचे इन्सेंटिव्ह मिळू शकते. प्रोत्साहन खरेदी किंमत आणि निवडलेल्या ठराविक मुदतीच्या कालावधीवर आधारित आहे. निवृत्तीनंतर लोकांचे कमाईचे साधन संपते. पण सामान्य जीवनातील खर्च वाढतच जातो. LIC ची ही योजना निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी उत्पन्नाचा स्रोत सुनिश्चित करते.

LIC ची नवीन जीवन शांती योजना ही एक वार्षिक योजना आहे. म्हणजेच ती घेताना, तुमची पेन्शनची रक्कम निश्चित केली जाते. यामध्ये तुम्हाला दरमहा पेन्शनची सुविधा मिळेल. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे.

LIC च्या नवीन जीवन शांती योजनेत तुम्हाला दोन प्रकारचे पर्याय मिळतात. पॉलिसीधारक सिंगल लाइफ आणि जॉइंट लाइफ डिफर्ड अॅन्युइटी यापैकी एक निवडू शकतात. पहिल्या पर्यायामध्ये, तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी पेन्शन योजना खरेदी करू शकता. जेव्हा पॉलिसीधारकाचा मृत्यू होतो तेव्हा सिंगल लाइफ पर्यायात नॉमिनी दिलेल्या व्यक्तीच्या खात्यावर पॉलिसीचे पैसे जमा होतात.

LIC पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास, त्याला ठराविक कालावधीनंतर पेन्शन मिळू लागते. जॉइंट लाइफ डिफर्ड अॅन्युइटीमध्ये एकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या व्यक्तीला पेन्शनची सुविधा मिळते. त्याच वेळी, दोन्ही व्यक्तींच्या मृत्यूनंतर, पॉलिसीचे पैसे नॉमिनीला दिले जातात. नवीन जीवन शांती योजना पॉलिसीच्या प्रारंभापासून गॅरंटीड अॅन्युइटी दर ऑफर करते.

LIC च्या या प्लॅनमध्ये किमान खरेदी किंमत १.५ लाख रुपये आहे. यामध्ये, तुम्हाला प्रति वर्ष १२ हजार रुपये किमान रक्कम दरवर्षी मिळेल. या पॉलिसीच्या कमाल खरेदी किंमतीला मर्यादा नाही. या योजनेनुसार, सिंगल लाइफसाठी डिफर्ड अॅन्युइटीच्या बाबतीत तुम्हाला १० लाख रुपयांची पॉलिसी खरेदी करून ११,१९२ रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.

याच प्लानच्या दुसऱ्या पर्यायात म्हणजेच जॉइंट लाइफ डिफर्ड अॅन्युइटीवर तुम्हाला १०,५७६ रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. अॅन्युइटीची रक्कम पॉलिसीच्या आधारावर असून, त्यात बदल होऊ शकतो. अधिक माहितीसाठी, तुम्ही एलआयसीच्या वेबसाइटवर संपर्क साधू शकता. (टीप - या लेखात केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)