LIC ची कमाल कामगिरी! दर मिनिटाला ४१ पॉलिसींची विक्री; विमा क्षेत्रातील वर्चस्व कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 07:52 PM2022-04-20T19:52:58+5:302022-04-20T19:58:26+5:30

LIC ने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २ कोटी १७ लाख विमा पॉलिसींची विक्री केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून LIC च्या IPO ची मोठीच चर्चा सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार एलआयसीचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. लवकरच शेअर बाजारात सदर आयपीओ सादर केला जाणार असून, हा सर्वांत मोठा आयपीओ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

यातच भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC of India) आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये दमदार कामगिरी करत विमा बाजारपेठेवरील वर्चस्व कायम ठेवले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात एलआयसीने प्रत्येक मिनिटाला ४१ पॉलिसींची विक्री केली.

LIC ने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २ कोटी १७ लाख विमा पॉलिसींची विक्री केली. २०२०-२१ च्या तुलनेत विक्रीत गेल्या वर्षात विमा विक्रीत ३.५४ टक्के वाढ झाली. त्याशिवाय ग्रुप इन्शुरन्स प्रिमियम (GRP) १३ टक्क्यांनी वाढला असल्याचे दिसून आले आहे.

LIC चा विमा बाजारातील हिस्सा ७४.६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात २ कोटी १० लाख विमा पॉलिसींची विक्री झाली होती. त्यावेळी एलआयसीचा बाजारात ७४.५१ टक्के हिस्सा होता.

LIC ला २०२१-२२ या वर्षात १ लाख ४३ हजार ९३८.५९ कोटी रुपयांचा ग्रुप इन्शुरन्स प्रिमियम (जीआरपी) मिळवला. यात त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत १२.६६ टक्के वाढ झाली होती.

LIC ला आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १ लाख २७ हजार ७६८.०६ कोटी रुपयांचा ग्रुप इन्शुरन्स प्रिमियम मिळाला होता. २०२०-२१ मध्ये मार्च २०२१ अखेर, वैयक्तिक नॉन-सिंगल प्रीमियम ८.८२ टक्क्यांनी वाढून २७ हजार ५८४.०२ कोटींवरून ३० हजार १५.७४ कोटींवर पोहोचला आहे.

LIC घेणाऱ्यांची प्रथम वर्षाचा प्रीमियम (FYP) १ लाख ९८ हजार ७५९.८५ कोटी इतका मिळाला. त्यात ७.९२ टक्के वाढ झाली. मागील आर्थिक वर्षातील एलआयसीला १ लाख ८४ हजार १७४.५७ कोटी रुपये पहिल्या वर्षाच्या प्रिमियममधून मिळाले होते.

मार्च २०२२ मध्ये वैयक्तिक सिंगल प्रीमियम्स ६१ टक्क्यांनी वाढून ४ हजार १८.३३ कोटी झाला. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत २ हजार ४९५.८२ कोटी मिळाले होते.

ग्रुप सिंगल प्रीमियम्स मार्च २०२२ मध्ये ४८.०९ टक्क्यांनी वाढून ३० हजार ५२.८६ कोटी इतका झाला. LIC जीआरपीची वाढ मागील वर्षाच्या तुलनेत ५९.५० टक्के इतकी राहिली.

LIC चा IPO आता चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बाजारात धडकण्याची शक्यता आहे. सेबीला सादर केलल्या माहितीपत्रकानुसार ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत एलआयसीचे मूल्य ५ लाख ३९ हजार ६८६ कोटी आहे.

IPO मध्ये केंद्र सरकारची ३१ कोटी ६२ लाख ४९ हजार ८८५ इक्विटी शेअर्स विक्री करण्याची योजना आहे. तत्पूर्वी महामंडळाने नुकताच आर्थिक वर्ष २०२१-२२ चा निकाल जाहीर केला.

दरम्यान, केंद्र सरकार सरकार LIC IPO चे मूल्यांकन सुमारे ३० टक्क्यांनी कमी करण्याच्या तयारीत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत आलेली मंदी आणि अस्थिरतेमुळे भारतीय बाजारपेठेतही अस्थिरता दिसून येत आहे.