कोरोनानंतरही जागरुकता नाही; देशातील 95% लोक अजूनही विम्याशिवाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:58 PM2023-12-15T16:58:51+5:302023-12-15T17:12:42+5:30

Life Insurance In India : नॅशनल इंन्शुरन्स अकॅडमीच्या रिपोर्टमधून हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

Life Insurance In India : गेल्या काही काळात विम्याबाबत मोठ्या प्रमाणात जागरुकता पाहायला मिळतीये. कोरोनापासून लोकांचा विमा काढण्याचा कलही मोठ्या बराच वाढलाय. पण, आता एका रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नॅशनल इन्शुरन्स अकॅदमीच्या (National Insurance Academy) अहवालात आकड्यांसह असे सांगण्यात आले आहे की, देशातील सुमारे 95 टक्के लोकसंख्या अजूनही विम्याशिवाय आहे.

पीटीआयच्या मते, राष्ट्रीय विमा अकादमीचा हा अहवाल भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे अध्यक्ष देवाशिष पांडा यांनी गुरुवारी जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, भारतात सध्या फक्त 5 टक्के लोकसंख्येकडे विमा संरक्षण आहे. या रिपोर्टमध्ये सादर केलेल्या आकडेवारीसमोर, विम्याविषयी जागरुकता पसरवणारे सर्व दावे फोल ठरत आहेत.

कोरोनासारख्या महामारीच्या काळात विम्याचे महत्त्व समोर आले होते, परंतु सरकार आणि विमा नियामक IRDAI च्या सर्व प्रयत्नांनंतरही लोक विमा काढण्याला तितकेसे महत्त्व देत नाहीत. या रिपोर्टबाबत IRDAI चे अध्यक्ष देवाशिष पांडा म्हणाले की, विमा कंपन्यांनी या दिशेने अधिक चांगले प्रयत्न करण्याची गरज आहे.

अहवालात दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकली, तर देशातील 73 टक्के लोकसंख्येला आरोग्य विम्याचा लाभ मिळत नाही. देशातील नैसर्गिक आपत्ती आणि इतर हवामानाशी संबंधित आपत्तींच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता विमा संरक्षण वाढवणे महत्त्वाचे झाले आहे. देवाशिष पांडा म्हणाले की, अति जोखीम असलेल्या भागात सक्तीचा नैसर्गिक आपत्ती विम्याची गरज असून याची शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे.

भारतातील विमा क्षेत्राची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. सध्या देशात 34 सामान्य विमा कंपन्या आणि 24 जीवन विमा कंपन्या कार्यरत आहेत. अनेक अहवालांमध्ये या क्षेत्रात 15-20 टक्के वेगाने वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण असे असूनही विमा काढण्यात देशातील लोकांची आवड कमी आहे. IRDAI नुसार, बँकिंग सेवांव्यतिरिक्त विमा सेवा देशाच्या GDP मध्ये सुमारे 7 टक्के योगदान देत आहेत.