नोकरीच्या शोधात आहात? सावधान..! या पाच क्षेत्रांतील नोकऱ्या होत आहेत कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 08:27 AM2023-03-05T08:27:18+5:302023-03-05T08:31:42+5:30

पाहा कोणती आहेत ही क्षेत्रं आणि का होतोय नोकऱ्यांवर परिणाम.

शारीरिक श्रमाच्या नोकऱ्या : ऑटोमेशन व रोबोटिक्स टेक्नॉलॉजीतील वेगवान प्रगतीमुळे कारखान्यांतील श्रमिकांच्या, असेंब्ली लाईनवरील कर्मचाऱ्यांच्या, बांधकाम कामगारांच्या शारीरिक श्रमाच्या कामाच्या मागणीत पुढील १० वर्षांत मोठी घट होऊ शकते. टेस्लामध्ये केवळ १६ रोबोंमुळे पाच हजार मानवी कामगारांची आवश्यकता संपली.

डाटा एंट्री क्लर्क व रिसेप्शनिस्ट : व्हॉइस रिकग्निशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगच्या वाढत्या उपयोगाबरोबरच डाटा एंट्री क्लर्क व रिसेप्शनिस्टचे काम स्वयंचलित प्रणालीद्वारे केले जात आहे. काही कंपन्यांनी रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामुळे डाटा एंट्री ऑपरेटरची गरज संपू शकते.

ऑफलाइन सेल : भारतात ऑनलाइन खरेदीमध्ये वाढ होत असल्यामुळे पारंपरिक रिटेलमध्ये नोकऱ्यांची मागणी कमी झाली आहे. विशेषत: कोरोना काळापासून घरबसल्या सर्व काही मागवण्याचा ट्रेंड वाढला आहे. वेबसाइटवरून खरेदी केलेल्या साहित्याची किंमत रिटेल स्टोअरपेक्षा कमी असते. याचा परिणाम रिटेल जॉब्जवर पडू शकतो.

लीगल रिसर्च आणि फायनान्शियल ॲनालिसिस : जेपी मॉर्गन चेसकडून विकसित व्हर्च्युअल असिस्टंट (कॉन्टॅक्ट इंटेलिजन्स)द्वारे कायदेशीर दस्तावेजांची समीक्षा व व्याख्या करण्यासाठी मशीन लर्निंग अल्गोरिदमचा उपयोग केला जातो. यामुळे लीगल प्रोफेशनल्सची गरज कमी होईल.

डाक व कुरिअर सेवा : ई-मेल आणि डिजिटल कम्युनिकेशनच्या उदयाने डाक व कुरिअर सेवेच्या मागणीत घट आली आहे. जगात सर्वांत जास्त इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशांत भारताचा क्रमांक आहे. कुरिअर व पोस्टल सेवेचा उपयोग सध्या वस्तू पाठविण्यासाठी मुख्यतः होतो.

टॅग्स :नोकरीjob