जोखीम कमी, नफाही बक्कळ; बघा हा फंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 01:15 PM2023-09-02T13:15:05+5:302023-09-02T13:38:56+5:30

या पर्यायामुळे जागतिक बाजार तसेच विदेशी बाजारांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होत असते.

नवी दिल्ली : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात नागरिक रस घेऊ लागले आहेत. गुंतवणुकीचे विविध पर्याय त्यांच्यासमोर असतात. आपल्या गुंतवणुकीची क्षमता आणि बाजाराकडून अपेक्षेनुसार जो तो पर्यायांची निवड करीत असतो.

सेन्सेक्स आणि निफ्टीच्या तुलनेत बहुतांश ॲक्टिव्ह फंडांमधून मिळणाऱ्या परताव्यात बऱ्यापैकी घट झाल्याने गेल्या दीड वर्षात गुंतवणूकदारांनी पॅसिव्ह फंडांकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे.

२०२३-२०२४ या आर्थिक वर्षात आतापर्यंत पॅसिव्ह फंडांचा एयूएम (व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता) तब्बल ८ लाख कोटींच्या घरात गेला आहे. म्युच्यअल फंडाच्या उलाढालीत पॅसिव्ह फंडाचा वाटा २१ टक्के इतका आहे. यात इंडेक्स फंड, ईटीएफ आणि फंड ऑफ फंड्स यांचा समावेश आहे. या पर्यायामुळे जागतिक बाजार तसेच विदेशी बाजारांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होत असते.

ईटीएफ : यात गुंतवणूक केल्याने शेअर बाजार व म्युच्युअल फंड दोन्हींचा लाभ मिळतो. यातून गुंतवणूकदार शेअर बाजार, कमोडिटी व बॉण्डमध्ये पैसे गुंतवू शकतो. ईटीएफमध्ये गुंतवणुकीसाठी डी-मॅट अकाउंट असणे गरजेचे असते.

फंड ऑफ फंडस् : यात शेअर बाजार, कमोडिटी किंवा बॉण्ड आदींमध्ये पैसे न गुंतवता अशा म्युच्युअल फंडांची निवड केली जाते ज्यांची गुंतवणूक या तिन्हीमध्ये असते. यात दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात घरगुती फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते तर दुसऱ्या प्रकारातील फंड ऑफ फंडस्मध्ये विदेशी कंपन्यांमध्ये पैसे गुंतविणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये पैसे लावले जातात.

इंडेक्स फंड : ही सुविधेद्वारे स्टॉक एक्स्चेंजवर नजर ठेवली जाते. जर तुम्ही निफ्टी ५० इंडेक्स फंडात पैसे गुंतवित असाल तुमचे पैसे त्या ५० समभागांमध्ये आपोआप विभागले जातात. यामध्ये ॲक्टिव्ह फंडप्रमाणे चढ-उतार होत नाहीत.

ज्यांना कमीत कमी जोखिम स्वीकारून जास्तीत जास्त परतावा मिळवायचा आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड सर्वात उत्तम आहे. जे बेंचमार्क इंडेक्सकडून मिळालेल्या परताव्यावर संतुष्ट आहेत, अशांसाठी हा पर्याय चांगला आहे.