यावर्षी आतापर्यंत एलपीजीच्या दरात झाली १४० रुपयांची वाढ; ५ वेळा वाढले दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 04:15 PM2021-07-01T16:15:07+5:302021-07-01T16:18:09+5:30

LPG Cylinder Price Hike : एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा झाली वाढ. गेल्या सहा महिन्यांदा पाचव्यांदा करण्यात आली दरवाढ.

एकीकडे कोरोना अनेकांच्या कमाईवर परिणाम झाला आहे. तरी दुसरीकडे महागाईनं लोकांचं कंबरडं मोडलं आहे. गेले तीन महिने शांत राहिल्यानंतर पुन्हा एकदा आता एलपीजीच्या दरात वाढ झाली आहे.

घरगुती एलपीजीच्या दरात या महिन्यात २५.५० रूपयांची वाढ झाली. एप्रिल ते जून या कालावधीत दिल्लीत विना अनुदानीत सिलिंडरची किंमत ८०९ रूपये इतकी होती. परंतु १ जुलैपासून ती ८३४.५० रूपये इतकी झाली आहे.

यावर्षी जर जानेवारी महिन्यापासून आतापर्यंतचं सांगायचं झालं तर १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १४०.५० रूपयांची वाढ झाली आहे.

१ जानेवारी रोजी दिल्लीमध्ये १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ६९४ रूपये इतकी होती. परंतु आता ती ८३४.५० रूपयांवर पोहोचली आहे.

यावर्षी एलपीजी सिलिंडरचे दर फेब्रुवारी महिन्यातच तीन वेळा वाढवण्यात आले होते. ४ फेब्रुवारीला २५ रूपये, १४ फेब्रुवारीला ५० रूपये आणि त्यानंतर २५ फेब्रुवारीला तिसऱ्यांदा म्हणजेच २५ रूपयांची वाढ करण्यात आली होती.

यानंतर १ मार्च रोजी पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या दरम्यान १ एप्रिल रोजी सिलिंडरच्या दरात १० रूपयांची कपात करण्यात आली होती.

परंतु आता जुले महिन्यात पुन्हा एकदा म्हणजेच जानेवारी महिन्यापासून पाचव्यांदा एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले.

दिल्लीतही सिलिंडरचा दर ८३४.५० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. आधी सिलिंडरसाठी ८०९ रुपये मोजावे लागायचे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी इंधन कंपन्या सिलिंडरच्या दरांबद्दल निर्णय घेतात.

मुंबईत गेल्या महिन्यात ८०९ रुपयांना मिळणारा १४.२ किलोचा सिलिंडर आता ८३४.५० रुपयांना मिळेल. कोलकात्यात याच सिलिंडरसाठी ८६१ रुपये मोजावे लागतील.

आधी याच सिलिंडरची किंमत ८३५.५० रुपये इतकी होती. चेन्नईत आधी ८२५ रुपयांना मिळणारा सिलिंडर ८५०.५० रुपयांना मिळेल.