महाराष्ट्र १, कर्नाटक २... ही कोणती लिस्ट, पाहा या यादीत कोणतं राज्य कोणत्या स्थानावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:12 IST2025-01-24T09:02:04+5:302025-01-24T09:12:01+5:30
GST Collection : पाहा ही अशी कोणती यादी आहे, ज्यात महाराष्ट्रानं पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. या यादीत महाराष्ट्रानंतर कर्नाटक, तामिळनाडू यांसारख्या राज्यांचा समावेश आहे.

GST Collection News : जीएसटी (वस्तू व सेवा कर) हा सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. जमा झालेला पैसा शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासासारख्या सार्वजनिक सेवांसाठी वापरला जातो. जीएसटी संकलन हे भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणता येईल. हा एकात्मिक कर आहे जो केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही कडून गोळा केला जातो.
जीएसटी संकलनात कोणते राज्य आघाडीवर आहे, हे काळानुसार बदलते. मात्र, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक ही राज्ये जीएसटी संकलनात आघाडीवर आहेत. या राज्यांमध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्रांची संख्या मोठी आहे आणि ते त्यांच्यापेक्षा जास्त जीएसटी जमा करतात.
नुकत्याच जाहीर झालेल्या डिसेंबर २०२४ च्या जीएसटी आकडेवारीत उत्तर प्रदेशनंही चांगली कामगिरी केल्याची माहिती समोर आलीये. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं राज्यही टॉप ५ मध्ये सामील झालं.
डिसेंबर २०२४ मध्ये बहुतांश राज्यांनी चांगलं उत्पन्न मिळवलं. त्यात महाराष्ट्र आघाडीवर होता. त्यानंतर कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. डिसेंबर २०२४ मध्ये अंदमान निकोबार, सिक्कीम, पंजाब आणि हरयाणामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.
या राज्यांनी २२ ते ७२ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या मोठ्या राज्यांनीही अनुक्रमे ९% आणि ७ टक्क्यांची चांगली वाढ दाखवली. ही आकडेवारी देशाच्या भक्कम अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधते.
दरम्यान, सर्वाधिक जीएसटी कलेक्शन करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रानं आघाडी घेतली. महाराष्ट्रानं २९,२६० कोटी रुपयांची जीएसटी जमा केला. तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य असून त्यांनी १२,५२६ कोटी रुपयांचा, त्यानंतर तामिळनाडू १०,९५६ कोटी, हरयाणा १०,४०३ कोटी, गुजरात १०,२७९ कोटी आणि उत्तर प्रदेशनं ८,११७ कोटी रुपयांचा जीएसटी जमा केला. तर पश्चिम बंगालनं ५,१९० कोटींचा जीएसटी जमा केला. महाराष्ट्रानं दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकाच्या दुपटीपेक्षाही अधिक जीएसटी जमा केलाय.
डिसेंबर २०२४ च्या जीएसटी संकलनाच्या राज्यनिहाय तपशीलावरून देशातील बहुतेक राज्यांमध्ये जीएसटी संकलन वाढलं असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्र पुन्हा एकदा आघाडीवर राहिला. त्याखालोखाल कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरयाणा आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.
अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा जीएसटी संकलनावर परिणाम होतो. मंदीच्या काळात जीएसटी संकलन कमी असू शकते. जीएसटी दरांचाही जीएसटी संकलनावर परिणाम होतो. कराचे दर वाढल्यानं जीएसटी संकलन वाढू शकतं. जीएसटी संकलनात टॅक्स कम्प्लायन्स हा महत्त्वाचा घटक आहे. सरकारी धोरणांचाही जीएसटी संकलनावर परिणाम होतो.