अनेकांना माहीत नाही Mutual Funds मध्ये गुंतवणूकीची पद्धत STP देखील आहे; SIP पेक्षा किती निराळी, पाहा
By जयदीप दाभोळकर | Updated: March 26, 2025 10:48 IST2025-03-26T10:30:36+5:302025-03-26T10:48:32+5:30
SIP vs STP Mutual Fund Investment: एसआयपी आजकाल गुंतवणुकीचा एक लोकप्रिय मार्ग आहे. लोक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात.

SIP vs STP Mutual Fund Investment: एसआयपी आजकाल गुंतवणुकीचा एक लोकप्रिय मार्ग आहे. लोक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. बाजारावर आधारित ही योजना इतर सर्व योजनांच्या तुलनेत चांगला परतावा देऊ शकते, असं बहुतांश तज्ज्ञांचं मत आहे.
दीर्घ मुदतीत सरासरी परतावा १२ टक्क्यांच्या आसपास असल्याचं मानलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का की एसटीपी हा देखील म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा एक मार्ग आहे. एसटीपी म्हणजे काय आणि तो एसआयपीपेक्षा किती वेगळा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू.
एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूकदार ठराविक अंतरानं ठराविक रक्कम गुंतवतात. एसआयपी मध्ये दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक असे सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा हा पद्धतशीर मार्ग आहे. दीर्घकालीन एसआयपीमध्ये कंपाउंडिंगचा फायदा घेता येतो.
एसटीपी म्हणजे सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. एसआयपीसारख्या म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचाही हा एक मार्ग आहे. एसटीपीमध्ये गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनेत (सहसा डेट फंड) एकरकमी रक्कम गुंतवतात आणि नंतर नियमित अंतराने इक्विटी योजनांमध्ये ट्रान्सफर करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर एसटीपी ही एक एसआयपी आहे जी एका म्युच्युअल फंडातून दुसऱ्या म्युच्युअल फंडात केली जाते.
जर तुमच्याकडे १ लाख रुपये असतील आणि तुम्हाला सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या माध्यमातून इक्विटी फंडात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला लिक्विड फंड किंवा डेट स्कीम शोधावी लागेल आणि संपूर्ण १ लाख रुपये त्या स्कीममध्ये टाकावे लागतील. आता समजा तुम्ही तुमचे पैसे डेट फंडात गुंतवलेत. त्याचबरोबर तुमची रक्कम इक्विटीमध्ये ट्रान्सफर होईल असा ठराविक कालावधीही तुम्ही ठरवता.
समजा तुम्हाला दरमहा १०,००० रुपये ट्रान्सफर करायचे आहेत. त्यामुळे तुमची १ लाख रुपयांची रक्कम १०-१० हजार करून १० महिन्यांत डेट फंडातून इक्विटी फंडात ट्रान्सफर होईल. अशा प्रकारे पद्धतशीरपणे एका म्युच्युअल फंडातून दुसऱ्या म्युच्युअल फंडात पैसे ट्रान्सफर केले जातात. सर्वसाधारणपणे इक्विटी फंडात एकरकमी गुंतवणूक करायची असेल, पण त्याशी संबंधित चढ-उतार टाळायचे असतील तर ही स्कीम निवडण्याचा सल्ला दिला जातो.
एसआयपी आणि एसटीपी हे दोन्ही गुंतवणुकीचे पद्धतशीर मार्ग आहेत. दोन्ही मध्ये कॉस्ट एव्हरेजींगचा फायदा मिळतो. मात्र, दोघांचेही हेतू वेगवेगळे आहेत. ज्या गुंतवणूकदारांना एकरकमी ऐवजी दीर्घ काळासाठी पद्धतशीर पद्धतीनं छोटी रक्कम गुंतवून मोठा फंड उभा करायचा आहे, त्यांच्यासाठी एसआयपी चांगली आहे.
त्याचबरोबर जे गुंतवणूकदार आपले संपूर्ण पैसे एकाच वेळी इक्विटी योजनांमध्ये गुंतवण्यास टाळाटाळ करतात, ते एसटीपीचा पर्याय निवडू शकतात. इक्विटीमध्ये एकरकमी पैसे गुंतवणं धोक्याचे ठरू शकतं. एकूणच कोणत्या एसआयपी आणि एसटीपीमध्ये गुंतवणूक करायची याचा निर्णय गुंतवणूकदाराच्या आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असतो. यासाठी तुम्ही एखाद्या आर्थिक तज्ज्ञाचा सल्ला घेऊन निर्णय घेऊ शकता.