Bhakti Modi Reliance Group : मुकेश अंबानींच्या घरात झालेला विवाह; आता रिलायन्सच्या 'या' ब्रँडच्या सीईओ, कोण आहेत भक्ती मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 09:17 AM2024-09-12T09:17:24+5:302024-09-12T09:27:57+5:30

Bhakti Modi Reliance Group : रिलायन्स समूहाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. कपड्यांपासून ते इंधनापर्यंतच्या अनेक व्यवसायांमध्ये रिलायन्सनं आपली व्याप्ती वाढवली आहे. पण एक असा ब्रँड आहे ज्यात भक्ती मोदी यांचंही नाव घेतलं जातं. जाणून घेऊ कोण आहेत भक्ती मोदी.

रिलायन्स समूहाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. कपड्यांपासून ते इंधनापर्यंतच्या अनेक व्यवसायांमध्ये रिलायन्सनं आपली व्याप्ती वाढवली आहे. परंतु रिलायन्सचा एक असा ब्रँड आहे, ज्याचं नेतृत्व रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सहकारी मनोदी मोदी यांची कन्या करत आहे. त्यांचं नाव म्हणजे भक्ती मोदी.

भक्ती मोदी ही मुकेश अंबानी यांचे अत्यंत जवळचे सहकारी मनोज मोदी यांची मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वी त्या रिलायन्स रिटेलच्या ब्युटी प्लॅटफॉर्म 'तिरा'च्या सीईओ बनल्या आहेत. ३३ वर्षीय भक्ती मोदी यांनी ईशा अंबानी यांच्यासोबत एकत्र काम केलंय. ईशा अंबानी रिलायन्स रिटेल व्हेन्चर्सच्या संचालक मंडळात आहेत. त्या समूहाच्या निरनिराळे रिटेल प्लॅटफॉर्म सांभाळतात.

दरम्यान, रिलायन्स रिटेलचे एमडी व्ही. सुब्रह्मण्यम यांनाही भक्ती यांच्याकडून मार्दर्शन मिळत आहे. त्यांचे वडील मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय असल्यानं त्यांच्यासाठीही खास जागा आहे. ते रिलायन्स रिटेल, EIH आणि जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संचालक मंडळात आहेत. मुकेश अंबानी हेदेखील भक्ती मोदी यांना आपल्या मुलीप्रमाणेच मानतात.

मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे जुने मित्र आहेत. या दोघांची जवळीक किती आहे याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, मनोज मोदी यांची मुलगी भक्ती यांचं लग्न मुकेश अंबानी यांच्या घरी झालं होतं. २०१६ मध्ये भक्ती यांचा विवाहसोहळा मुकेश अंबानी यांनी आपल्या घरी आयोजित केला होता.

मनोज मोदी आणि मुकेश अंबानी हे दोघेही कॉलेजपासून एकत्र आहेत. रिलायन्सच्या ऑफिसमध्ये मनोज यांना एमएम म्हणजेच मास्टर माइंड म्हणतात. हे तेच मनोज मोदी आहेत ज्यांना मुकेश अंबानी यांनी १५०० कोटी रुपयांची २२ मजली इमारत भेट दिल्याची बातमी चर्चेत आली होती.

एप्रिल २०२३ मध्ये ईशा अंबानी यांनी अधिकृतपणे तिरा ब्रँड लाँच केला. तेव्हापासून भक्ती मोदी रिलायन्स रिटेलमध्ये को-फाऊंडर म्हणून लीडरशिप टीमचा भाग म्हणून स्ट्रॅटजी आणि एक्झिक्युशन हाताळत आहेत. गेल्या काही काळापासून त्या रिलायन्स रिटेलमध्ये स्ट्रॅटेजी आणि नवीन बिझनेस आयडियावर काम करत होत्या. ऑगस्ट २०२२ मध्ये भक्ती मोदी यांची रिलायन्स ब्रँड्समध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यांना वार्षिक ५ कोटी रुपये पगार मिळाला.

इकॉनॉमिक टाइम्सनं एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार त्यांची भूमिका केवळ तीरापुरती मर्यादित नाही. संपूर्ण ब्युटी आणि फॅशन डिव्हिजनला आकार देण्यात त्यांचा सहभाग आहे. सेफोरा आणि किको मिलानो यांच्यासोबतही भागीदारी आहे. प्रीमियम आंतरराष्ट्रीय ब्रँड भारतात आणणं आणि स्वतःचं लेबल तयार करणं यासारख्या महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमध्येही त्यांचा सहभाग आहे.