Modi 3.0 ची कमाल! १० दिवसांत ₹७०००००००००००० चा नफा, 'या' शेअर्सनं केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 09:24 AM2024-06-22T09:24:09+5:302024-06-22T09:34:16+5:30

Modi 3.0 Shares Profit : सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनं गेल्या दहा दिवसांत सात लाख कोटी रुपयांचा नफा कमावत जबरदस्त तेजी दाखवली आहे. पाहा काय आहे यामागील कारण, काय म्हणतायत तज्ज्ञ?

Modi 3.0 Shares Profit : सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनं गेल्या दहा दिवसांत सात लाख कोटी रुपयांचा नफा कमावत जबरदस्त तेजी दाखवली आहे. या तेजीची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक व्यवस्थापन शैलीशी केली जात आहे. विश्लेषक आणि गुंतवणूकदार या मोठ्या तेजी मागची कारणं बारकाईने पाहत आहेत.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पीएसयू शेअर्सच्या प्रभावी कामगिरीत अनेक घटकांचा हातभार लागलाय. याचं एक महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारी मालकीच्या उद्योगांचे खासगीकरण आणि धोरणात्मक निर्गुंतवणुकीवर सरकारचा भर आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच अनेक सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या योजनेबाबत केलेल्या घोषणांनी गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

मोदी सरकारच्या खासगीकरणाच्या स्पष्ट आराखड्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे, असं एका उद्योग तज्ज्ञानं सांगितलं. या उद्योगांच्या अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर व्यवस्थापनाच्या शक्यतेला बाजार सकारात्मक प्रतिसाद देत आहे.

याशिवाय अनेक सार्वजनिक उपक्रमांच्या उत्तम आर्थिक कामगिरीनं गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि कोल इंडिया सारख्या कंपन्यांचे तिमाही निकाल मजबूत आहेत. यामुळे त्यांच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाली असल्याचंही सांगण्यात येतंय.

सरकारी कंपन्या मजबूत आर्थिक स्थिती दर्शवित आहेत. त्यांचा नफा गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा आहे. या शेअर्समधून परताव्याची शक्यता बाजार ओळखत असल्याचं आणखी एका तज्ज्ञानं म्हटलं. तेजीला हातभार लावणारा आणखी एक घटक म्हणजे पीएसयू शेअर्सचे आकर्षक मूल्यांकन. यातील अनेक शेअर्स त्यांच्या खाजगी क्षेत्रातील समकक्षांपेक्षा तुलनेनं कमी मूल्यांकनावर ट्रेड करत होते. यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनले. नुकत्याच झालेल्या तेजीमुळे मूल्यांकनातील ही तफावत काही प्रमाणात भरून काढण्यास मदत झाली आहे.

एका इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्टनं सांगितलं की, पीएसयू शेअर्सच्या कमी मूल्यांकनामुळे गुंतवणूकदारांना आकर्षक संधी मिळाली. सध्या सुरू असलेल्या सुधारणा आणि धोरणात्मक उपक्रमांमुळे या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. पीएसयू शेअर्समधील तेजीला सकारात्मक जागतिक बाजाराचा कल आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूक वाढल्यानंदेखील पाठिंबा मिळाला आहे. जागतिक बाजार मजबूत असल्यानं स्पिलओव्हर इफेक्टचा फायदा पीएसयूसह भारतीय शेअर्सना झाला आहे.

या तेजीमध्ये नफा झाला असला तरी गुंतवणूकदारांनी सावध गिरी बाळगावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. बाजारात अस्थिरता असू शकते. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी सखोल अभ्यास करणं आणि दीर्घकालीन शक्यतांचा विचार करणं महत्वाचं आहे. पीएसयू शेअर्समधील अलीकडील तेजी सरकारी सुधारणा, मजबूत वित्तीय कामगिरी, आकर्षक मूल्यांकन आणि सकारात्मक जागतिक बाजारपेठेचा कल यांचं कॉम्बिनेशन दाखवत आहे.

मोदी सरकार खासगीकरण आणि धोरणात्मक उपक्रमांवर भर देत आहे. पीएसयू शेअर्सची कामगिरी येत्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांसाठी फोकस पॉईंट राहील. (टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)