नोकरी सोडली तर ऐकावे लागले टोमणे; IIT मधून आलेल्या मित्रांनी उभं केलं ४०००० कोटींचं साम्राज्य, काय आहे व्यवसाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 09:01 IST2025-01-04T08:48:44+5:302025-01-04T09:01:40+5:30

Meesho Success Story : कोणतंही यश हे सहजासहजी मिळत नाही. यश मिळवण्यासाठी अंगी मेहनत आणि जिद्द असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अपार मेहनत केली तर यश हे मिळतंच.

Meesho Success Story : कोणतंही यश हे सहजासहजी मिळत नाही. यश मिळवण्यासाठी अंगी मेहनत आणि जिद्द असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अपार मेहनत केली तर यश हे मिळतंच. आज आपण अशा मित्रांची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हजारो कोटींची कंपनी सुरू केली.

आयआयटी दिल्लीतील विदित अत्रेय आणि संजीव बरनवाल या दोन मित्रांनी मेहनत आणि निष्ठेने मीशो नावाचं सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केलंय. मीशो हे 'माय शॉप'चं संक्षिप्त रूप आहे.

प्रामुख्याने महिला उद्योजकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती. २०१५ मध्ये सुरू झालेली ही कंपनी आता जवळपास ४०,००० कोटी रुपयांचं साम्राज्य बनली आहे. विदित अत्रेय आणि संजीव बरनवाल यांच्या यशाच्या प्रवासावर एक नजर टाकू.

विदित आत्रेय आणि संजीव बरनवाल खास मित्र आयआयटी दिल्लीमधील विद्यार्थी आहेत. दोघंही मिशोचे संस्थापक आहेत. हे एक सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. यामुळे ई-कॉमर्स उद्योगात क्रांती झाली. आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर संजीव बरनवाल जपानला गेले. तिथे त्यांनी सोनीच्या कोअर टेक टीममध्ये काम केलं.

या दरम्यान त्यांना खूप काही शिकायला मिळालं. खूप चांगला अनुभव मिळाला. तरीही स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची त्यांची नेहमीच इच्छा होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपला मित्र विदित आत्रेय यांच्याशी संपर्क साधला. विदित त्यावेळी बंगळुरू स्थित इनमोबी या कंपनीत काम करत होते.

जून २०१५ मध्ये स्टार्टअप आयडियावर काम करत असताना संजीव आणि विदित यांनी नोकरी सोडली. जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हा लोकांचे टोमणेही ऐकावे लागले. याचं एक कारण म्हणजे दोघांनाही आपापल्या नोकरीत खूप चांगला पगार मिळत होता. २०१५ च्या अखेरीस, मीशोनं बंगळुरूच्या कोरमंगला भागात दोन खोल्यांच्या एका छोट्या फ्लॅटमध्ये काम सुरू केले. त्याचं पहिलं ऑफिस म्हणजे डायनिंग टेबल.

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप व्यवसायासाठी पूर्णपणे योग्य नाही, असं आत्रेय आणि बरनवाल यांना वाटत होतं. विक्रेत्यांना सोशल मीडियाचा चांगला वापर करता यावा यासाठी त्यांनी मीशोची सुरुवात केली. मीशो एका अनोख्या बिझनेस मॉडेलवर काम करतं. यामध्ये बहुतांश गृहिणी असलेल्या 'रिसेलर्स' आपल्या वस्तू सोशल नेटवर्कवर विकतात.

अॅपवर 'विक्रेते' स्वत:ची बाजारपेठ तयार करतात. ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी ते व्हॉट्सअॅपचा वापर करतात. ते आपलं फेसबुक प्रोफाइल मीशोशी लिंक करतात. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेमेंट लिंकही पाठवली जाते. मीशो मालाची डिलिव्हरी सांभाळतं. विक्रेत्यांकडून कमिशन घेऊन कमाई करते.

मीशोनं महिला उद्योजकांसाठी रिसेलिंग प्लॅटफॉर्म म्हणून काम सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि पैसे कमविण्यास मदत झाली. कोणतीही प्राथमिक गुंतवणूक न करता, या सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने लाखो उद्योजकांना त्यांचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यास मदत केली आहे.

यामध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. मीशो हे भारतातील महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम बनलं आहे. यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास आणि देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. मीशोची यशोगाथा जगभरातील कोट्यवधी उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे आणि नाविन्यपूर्णतेची ताकद दाखवणारी आहे.