मोदी सरकार आता 'या' दोन बड्या कंपन्यांतील आपला हिस्सा विकणार; कोट्यवधी रुपये मिळवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 09:20 PM2021-08-29T21:20:30+5:302021-08-29T21:30:04+5:30

चालू आर्थिक वर्षात, बीपीसीएल, एअर इंडिया, शिपिंग कॉर्प ऑफ इंडियासारख्या कंपन्यांतील भाग आणि व्यवस्थापन नियंत्रण विकून, तसेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनला सुचिबद्ध करून निधी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

केंद्र सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीद्वारे 1.75 लाख कोटी रुपये जमवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत सरकारने अॅक्सिस बँक, एनएमडीसी लिमिटेड आणि हुडकोमधील आपला हिस्सा विकून चालू वर्षात 8,300 कोटी रुपये जमवले आहेत. (The Modi government will sell its fertilizer companies RCF and NFL's share to get rs 1200 crore)

याचाच एक भाग म्हणून, आता सरकार दोन खत कंपन्यांचे शेअर्स लवकरच विकण्याची तयारी करत आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत सरकार RCF आणि NFL या दोन खत कंपन्यांतील आपल्या शेअर्सची विक्री करून बाजारातून 1,200 कोटी रुपये जमवू शकते.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) मधील आपला 10 टक्के हिस्सा आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) मधील 20 टक्के हिस्सा ऑफर फॉर सेल (ओएफएस) च्या माध्यमाने विकणार आहे. या शेअर विक्रीतून सरकारला 1,200 कोटी रुपये मिळू शकतात, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

या शेअर्सच्या विक्रीसाठी मर्चंट बँकर्सची नियुक्ती आधीच करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे, की खत क्षेत्रासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे येणाऱ्या काही महिन्यांत शेअर्सच्या मूल्यांकनात सुधारणा होऊ शकते.

सध्या सरकारचा एनएफएलमध्ये 74.71 टक्के आणि आरसीएफमध्ये 75 टक्के हिस्सा आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीतून केवळ 38,000 कोटी रुपयेच मिळवले होते. कोरोनामुळे सरकार निर्गुंतवणुकीच्या आघाडीवर यशस्वी होऊ शकले नव्हते.

लक्षणीय गोष्ट ही, की शुक्रवारी BSE वर RCF चा शेअर 72.25 रुपयांवर बंद झाला होता, तर NFL चा शेअर 53.95 रुपयांवर बंद झाला होता. या बातमीनंतर सोमवारी या शेअर्सवर अॅक्शन बघायला मिळू शकते.

चालू आर्थिक वर्षात, बीपीसीएल, एअर इंडिया, शिपिंग कॉर्प ऑफ इंडियासारख्या कंपन्यांतील भाग आणि व्यवस्थापन नियंत्रण विकून, तसेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनला सुचिबद्ध करून निधी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.