एक महिन्याचा SIP हप्ता भरला नाही तर SIP बंद होईल? वाचा काय असतो नियम By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 03:59 PM 2023-06-20T15:59:18+5:30 2023-06-21T12:38:52+5:30
SIP मध्ये दर महिन्याला पैसे गुंतवावे लागतात. तुमच्या बँक खात्यातून ठराविक तारखेला पैसे कापले जातात, पण काही वेळा आपल्या खात्यावर पैसे शिल्लक नसतात त्यामुळे आपला हप्ता चुकतो, हे टाळण्यासाठी खात्यात शिल्लक असणे आवश्यक आहे. आपण पैशाची बचत करण्यासाठी अनेक ठिकाणी गुंतवणूक करतो. यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा उत्तम पर्याय मानला जातो. गुंतवणुकीच्या या पद्धतीमुळे नियमित बचतीची सवयही लागते आणि गुंतवणुकीवर चांगला परतावाही मिळतो.
पण, अनेक वेळा आपल्या खात्यात पुरेसे पैसे शिल्लक नसतात आणि हप्ता चुकतो. पण इंस्टॉलमेंट चुकले तर काय होईल? SIP थांबते का आणि SIP थांबल्यास काय करावे?
एसआयपी हप्ता दरमहा तुमच्या खात्यातून ऑटोमॅटीक डेबिट केला जातो. म्हणूनच हे महत्वाचे आहे की SIP च्या तारखेला, SIP मध्ये जाण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे तुमच्या खात्यात असणे आवश्यक आहे.
स्टॉक ब्रोकर देय तारखेला पेमेंट रिक्वेस्ट पाठवतो, पैसे उपलब्ध नसल्यामुळे पेमेंट केले जात नाही, बँक ते डीफॉल्ट म्हणून पाहते कारण तुम्ही आधीच ठरलेल्या तारखेला निश्चित रक्कम कापून घेण्यास मान्यता दिली आहे. अशा परिस्थितीत, बँक तुमच्याकडून पेमेंट डिफॉल्टचा दंड घेऊ शकते.
तुमच्या SIP चा हप्ता सलग ४ महिने चुकल्यास, तुमची SIP रद्द केली जाऊ शकते. पूर्वी हा नियम ३ महिन्यांसाठी होता मात्र आता हा नियम ४ महिन्यांसाठी करण्यात आला आहे.
एसआयपी रद्द करणे म्हणजे तुम्ही त्या एसआयपीमध्ये यापुढे पैसे गुंतवू शकणार नाही. तर, तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या मुदतपूर्तीनंतर तुम्ही ती काढू शकाल. सुरुवातीच्या योजनेच्या तुलनेत तुम्हाला कमी परतावा मिळण्याची शक्यता आहे.
SIP च्या देय तारखेला तुमच्या खात्यात एक निश्चित रक्कम असल्याची तुम्हाला खात्री करावी लागेल. जेणेकरून पेमेंट डिफॉल्ट होणार नाही. यासोबतच तुमच्या बँक खात्यावर नियमितपणे लक्ष ठेवा.
अनेकवेळा काहींच्या खात्यावर रक्कम कमी असते. उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्यामुळे किंवा इतर गरजांसाठी पैसा खर्च केल्यामुळे असे होऊ शकते. त्यामुळे जेव्हा तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तेव्हा तुम्ही तुमची SIP रद्द करू शकता किंवा थांबवू शकता.
बहुतेक फंड हाऊसेस SIP थांबवण्याचा किंवा तात्पुरता थांबवण्याचा पर्याय देतात. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील, तेव्हा तुम्ही तुमची SIP पुन्हा सुरू करू शकता.
काही म्युच्युअल फंड SIP मध्ये बदल करण्याचा पर्याय देखील देतात. यामध्ये तुम्ही एसआयपीची रक्कम बदलू शकता, वारंवारता बदलू शकता आणि पेमेंटची तारीख देखील बदलू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही एसआयपी चुकण्यापासून रोखू शकता, यासोबतच तुम्ही तुमच्या आर्थिक चक्रानुसार तुमच्या एसआयपीच्या तारखेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून पगार किंवा खात्यात पैसे येताच तुमचा एसआयपी कापला जाईल. यासह, तुमची नियमित बचत देखील सुरू राहील आणि SIP रद्द होण्याचा धोका राहणार नाही.