महिना संपण्यापूर्वीच खिसा होतो रिकामा? आजपासून या ५ टिप्स फॉलो करा, टेन्शल होईल दूर By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:57 PM 2024-12-02T12:57:27+5:30 2024-12-02T13:01:39+5:30
money management tips : तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील ज्यांचा खिसा महिना संपूण्यापूर्वीच रिकामा होतो. अगदी चांगला पगार असणाऱ्यांची देखील अशी अवस्था पाहिली असेल. याचं कारण म्हणजे आर्थिक नियोजनाचा अभाव. पण तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल ज्यांचा पगार महिना संपण्यापूर्वीच संपतो, तर आजपासूनच काही टिप्स फॉलो करा. आजकाल लोकांना बजेट तयार करायचं जीवावर येतं. मात्र, पूर्वीच्या काळी लोकं बजेट आखल्याशिवाय खर्च करत नव्हते. परिणामी तुटपुंजे उत्पन्न घेऊनही खूप बचत होत होती. तुम्हालाही बचत करायची असेल, तर पगार तुमचा पगार खात्यात जमा होण्यापूर्वीच बजेट तयार करा. ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्यांची यादी बनवा. या यादीत घरभाडे, वीज, कर्ज, रेशन आणि मुलांची फी यासारख्या गरजा समाविष्ट करा.
ऑनलाइन शॉपिंग करण्याऐवजी रोखीने खरेदी करा. ऑनलाइन शॉपिंगमुळे अनेकदा खर्चावर नियंत्रण राहत नाही. ऑनलाईन पेमेंटऐवजी रोखीने खरेदी करा. तुमच्या घरासाठी तयार केलेल्या बजेटनुसारच रोख रक्कम जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होताच, सर्वप्रथम बचतीचे पैसे बाजूला काढून ठेवा. आर्थिक नियमानुसार, प्रत्येकाने आपल्या पगारातील २० टक्के बचत करायला हवी. तुमच्या उत्पन्नातील २० टक्के रक्कम बचतीच्या नावावर वेगळी ठेवावी. ही रक्कम एखाद्या योजनेत गुंतवावी. त्यानंतर, उर्वरित रकमेनुसार घराचे बजेट बनवा.
बाहेरचे खाद्यपदार्थ, महागडे ब्रँडेड कपडे, गॅजेट्स, पार्ट्या इत्यादी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. यावर आपले भरपूर पैसे खर्च होतात. महिन्यातून एक किंवा दोनदा तुम्ही कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. पण दर आठवड्याला बाहेर जाणे, रोज घराबाहेरचे पदार्थ ऑर्डर करणे, यामुळे तुमचे बजेट तर बिघडतेच पण ते तुमच्या आरोग्यासाठीही चांगले नाही. याशिवाय महागडे ब्रँडेड कपडे, गॅजेट्स, पार्ट्या आणि जास्तीत जास्त ओटीटी सबस्क्रिप्शन देखील टाळता येऊ शकतात. मनोरंजनासाठी एक किंवा दोन OTT सबस्क्रिप्शन पुरेसे आहेत.
आपल्यापैकी बहुतेक लोक असे आहेत जे आपल्या आरोग्याकडे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. पण तुमची तब्येत ठीक नसेल तर तुमचा बराचसा पैसा उपचारावर खर्च होईल. तुमच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होईल. त्यामुळे तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि स्वतःला निरोगी ठेवा. कठीण काळात मोठा खर्च टाळण्यासाठी आरोग्य विमा उतरवला पाहिजे.