कोट्यवधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; २०२१ मध्ये मिळणार खूषखबर

By कुणाल गवाणकर | Published: November 4, 2020 06:42 PM2020-11-04T18:42:12+5:302020-11-04T19:00:24+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्याचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला.

आधीच समस्यांचा सामना करत असलेली अर्थव्यवस्था लॉकडाऊनमुळे आणखी संकटात सापडली. त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला. कित्येकांना पगार कपात सहन करावी लागली.

गेल्या काही दिवसांपासून मात्र अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. उत्पादन क्षेत्रानं चांगली उसळी घेतली आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्राला जीएसटीमधून १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे.

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २०२१ मध्ये देशातल्या कॉर्पोरेट्स कंपन्या चांगली पगारवाढ देण्याच्या विचारात आहेत.

देशातल्या ८७ टक्के कंपन्या पुढील वर्षी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणार असल्याचं एऑनच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. यावर्षी ७१ टक्के कंपन्यांनीच कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली होती.

कंपन्या पुढील वर्षी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणार असल्या तरीही ती फार मोठी नसेल. कर्मचाऱ्यांना ५ ते १० टक्के वेतनवाढ देण्याचा ६० कंपन्यांचा विचार आहे.

एऑनच्या सर्वेक्षणात २० पेक्षा जास्त क्षेत्रातल्या १ हजार ५० कंपन्यांचा सहभाग होता. एऑनचे सीईओ नितीन सेठी यांनी सर्वेक्षणाबद्दलची आकडेवारी दिली.

माहिती तंत्रज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्या, लाईफ सायन्सेस, ई-कॉमर्स, प्रोफेशनल सर्व्हिसेस आणि केमिकल्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुढल्या वर्षी चांगली पगारवाढ मिळेल.

२०२० मध्ये काही विशिष्ट उद्योगांना सर्वाधिक फटका बसला. त्यात रिटेल, रिअल एस्टेट आणि पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रांसह पर्यटन, हॉटेलिंगचा समावेश आहे. या क्षेत्रांमधल्या कंपन्यादेखील पुढील वर्षी पगारवाढ देणार आहेत. मात्र ती इतर क्षेत्रातल्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असेल.

Read in English