Air India ची घरवापसी लांबणार! TATA ला आणखी वाट पाहावी लागणार; कधी होणार अधिग्रहण? By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 12:07 PM 2021-12-30T12:07:47+5:30 2021-12-30T12:13:07+5:30
सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन टाटाकडे एअर इंडियाचे पूर्ण हस्तांतर होण्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो, असे सांगितले जात आहे. डबघाईला आलेली सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाचीटाटा समूहाने खरेदी केली. या व्यवहाराला भारतीय स्पर्धा आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ‘महाराजा’च्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र, Air India ची घरवापसीसाठी TATA ग्रुपला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात एअर इंडिया टाटा ग्रुपकडे जाणार, यावर शिक्कामोर्तब झाले होते. डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता.
मात्र, अधिग्रहणाची औपचारिकता आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. पुढील आठ आठवड्यांमध्ये अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दोन्ही पक्षांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
काही नियामकांकडून अद्यापही मंजुरी येणे बाकी आहे. ही प्रक्रिया जानेवारी महिन्यात पूर्ण होऊ शकते, अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. मात्र, निश्चित तारीख सरकारी पातळीवरून सांगण्यात आलेली नाही.
टाटा सन्सची मालकी असलेल्या टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने Air India खरेदीसाठी बोली लावली होती. २५ ऑक्टोबर रोजी एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्विसेसच्या खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली १८ हजार कोटी रुपयांची बोली विजयी ठरली होती.
Air India च्या विद्यमान कर्जदारांनी आता टाटाशी संबंधित कंपनीला ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. जी कंपनी आता एअर इंडियावर नियंत्रण ठेवणार आहे, त्या कंपनीला या बँकांनी कर्ज ऑफर केले आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिले असून, या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचा हवाला देत अहवालात असे सांगण्यात आले आहे की, एअर इंडियाला कर्ज देणाऱ्या बँकांनी टाटा सन्सशी संबंधित टॅलेसला (Talace) ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. हे कर्ज देखील फक्त ४.४५ टक्के वेटेड एव्हरेज यील्डवर देण्याची ऑफर देण्यात आली आहे.
खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Air India ही कंपनी टॅलेसच्या अधिपत्याखाली येईल. टाटा सन्स ही टॅलेसची प्रमोटर आहे. टॅलेसने एअर इंडियाला कर्ज देणाऱ्या बँकांना सर्वसाधारण कारणासाठी २३ हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी एका वर्षासाठी बोली लावण्यास सांगितले होते.
Air India च्या कर्जासाठी १८ हजारे कोटी रुपये आणि प्रारंभिक परिचालन खर्चासाठी ५ हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे कंपनीने सांगितले होते. बँकांची ही ऑफर टाटा समूहाबद्दलची विश्वासार्हता दर्शवते. Air India आर्थिक अडचणीत होती आणि त्यामुळे सरकारला त्याचे खाजगीकरण करावे लागले. आता टाटांच्या हाती Air India जाताच बँकांनी कर्ज देण्यास सुरुवात केली आहे.
अहवालात असेही सांगण्यात आले आहे की ज्या बँकांनी टाटाच्या कंपनीला स्वस्त कर्ज देण्याची ऑफर दिली आहे त्यात एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या बँकांनी ३ हजार कोटी रुपयांपासून १२ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज ऑफर केले आहे.
दरम्यान, प्रचंड तोट्यात असलेल्या Air India चे संचालन आता मोदी सरकारला जड जात आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर Air India चे हस्तांतरण TATA कडे करण्यावर भर दिला जात आहे. Air India वर ६१ हजार ५६२ कोटी रुपयांचे कर्ज आहे.
TATA च्या टॅलेसने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती, जी सर्वात मोठी बोली ठरली. या १८ हजार कोटी रुपयांपैकी १५ हजार ३०० कोटी रुपये एअर इंडियाच्या जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, तर २ हजार ७०० कोटी रुपये सरकारला रोख स्वरूपात द्यायचे आहेत.
तब्बल ६८ वर्षांनी Air India ची TATA मध्ये घरवापसी होणार आहे. TATA समूहातील टाटा सन्सकडे एअर इंडियाची एकूण १४१ विमाने टाटाला मिळणार आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ११८ विमाने उत्तमरित्या कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.
TATA सन्सला २३ विमानांची दुरुस्ती करावी लागणार आहे. Air India च्या विमानांची दुरुस्ती आणि देखभाल यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा सगळा खर्च टाटा सन्सला करावा लागणार आहे. कारण सरकार आता याचा खर्च करणार नसल्याचे सांगितले जात आहे.
Air India कडे आताच्या घडीला ५८ एअरबस, A320 फॅमिली विमाने, १४ बोइंग 777, २२ B787 ड्रीमलाइनर आणि AI एक्सप्रेसची २४ B737 एअरवर्थ असा विमानांचा भरगच्च ताफा आहे. हा सर्व ताफा TATA सन्सला मिळणार आहे.