Wipro: अदानी-अंबानींपेक्षाही दानशूर, मुकेश अंबानींपेक्षाही होते श्रीमंत; मारूती एस्टिमनं गेले तर गार्डनंही थांबवलेलं By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 09:24 AM 2024-07-26T09:24:20+5:30 2024-07-26T09:31:57+5:30
Wipro Azim Premji: भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रोचे माजी चेअरमन अझीम प्रेमजी आपल्या साधेपणासाठी आणि दानशूर म्हणून ओळखले जातात. २०१९ मध्ये त्यांनी विप्रोतील आपले ६७ टक्के शेअर्स दान केले होते. त्याचं मूल्य आज १.४५ लाख कोटी रुपये आहे. भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रोचे माजी चेअरमन अझीम प्रेमजी आपल्या साधेपणासाठी आणि दानशूर म्हणून ओळखले जातात. ७९ वर्षीय अझीम प्रेमजी एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. २०१९ मध्ये त्यांनी विप्रोतील आपले ६७ टक्के शेअर्स दान केले होते. त्याचं मूल्य आज १.४५ लाख कोटी रुपये आहे.
प्रेमजी नियमितपणे आपल्या कमाईचा मोठा भाग दान करतात. शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे. एकदा विप्रोचे सीईओ टीके कुरियन यांना प्रेमजी यांचा फोन आला. त्यांनी विप्रोच्या कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या टॉयलेट पेपरची किंमत विचारली. हे ऐकून कुरियन आश्चर्यचकित झाले. ही घटना प्रेमजींची सूक्ष्म दृष्टी आणि मितव्ययीपणा दर्शवते.
अझीम प्रेमजी यांचा जन्म २४ जुलै १९४५ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील मोहम्मद हाशिम प्रेमजी हे 'बर्माचे राईस किंग' म्हणून प्रसिद्ध होते. १९६६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर वयाच्या २१ व्या वर्षी प्रेमजी यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अभियांत्रिकी सोडली आणि भारत कौटुंबिक व्यवसाय सांभाळण्यासाठी परतले.
त्यांनी 'वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेड' (WVPL) हे नाव बदलून विप्रो केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली विप्रोने आयटी, हार्डवेअर, टॉयलेटरीज आदी क्षेत्रात वैविध्य आणलं. आज २.६५ लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह ही भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे.
भारतातील १७ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून ते सर्वाधिक दानशूर म्हणूनही ओळखले जातात. २०२३ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबानं १,७७४ कोटी रुपयांची देणगी दिली, जी २०२२ च्या तुलनेत २६७ टक्के अधिक आहे. त्यांची फाऊंडेशन गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल क्लासरूम आणि वंचित मुलांसाठी शिष्यवृत्तीचे देते.
२०१९ मध्ये प्रेमजी यांनी विप्रोचे ६७ टक्के शेअर्स दान केले होते, ज्याची किंमत तेव्हा ५० हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक होती आणि आता ती १.४५ लाख कोटी रुपये झाली आहे. फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत २०२४ मध्ये अझीम प्रेमजी १००४३ कोटी रुपयांच्या संपत्तीसह १६५ व्या स्थानावर आहेत.
अझीम प्रेमजी हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. आपली बीपीओ कंपनी विप्रोला विकणारे रमण रॉय यांनी एका माध्यमासोबत त्यांचा किस्सा शेअर केला होता. एका गार्डनं प्रेमजी यांना कंपनीत प्रवेश दिला नाही. ते साध्या मारुती एस्टीममध्ये आले होते. कोट्यधीश अशी गाडी चालवेल यावर गार्डचा विश्वासच बसत नव्हता. प्रेमजींची नम्रता त्यांच्या वागण्यातही दिसून येते, असं ते म्हणाले.
विप्रोचे माजी कर्मचारी नितीन मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान प्रेमजी यांनी आपल्या कुटुंबासह आणि सहकाऱ्यासोबत मारुती व्हॅन शेअर करण्याचा आग्रह धरला होता. आपण इतरांपेक्षा वेगळे नाही, असंही ते म्हणाले. आपण ही सर्वार्थाने इतरांप्रमाणेच आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. साधेपणा आणि औदार्य यामुळे अफाट यश आणि संपत्ती कशी मिळू शकते याची साक्ष अझीम प्रेमजी यांचं जीवन आहे. त्यांचं हा जीवनप्रवास नक्कीच आपल्याला प्रेरणा देतो.