मुकेश अंबानींचा मेगा प्लॅन; टेलिकॉमनंतर आता म्यूचुअल फंड क्षेत्रात उतरण्याची तयारी... By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 05:04 PM 2023-08-21T17:04:45+5:30 2023-08-21T17:12:50+5:30
टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवल्यानंतर मुकेश अंबानी म्युच्युअल फंड क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्सने Jio Financial Services नावाने कंपनी लिस्ट केली आहे. पाहा डिटेल्स... Mukesh Ambani: टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडवल्यानंतर मुकेश अंबानी म्युच्युअल फंड क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्सने फायनान्शियल सर्व्हिसेज बिझनस वेगळा केला आहे. हा Jio Financial Services च्या नावाखाली लिस्टेड आहे. कंपनीने अद्याप आपला रोडमॅप जाहीर केलेला नाही, पण तज्ज्ञांच्या मते कंपनी म्युच्युअल फंड क्षेत्रात उतरण्याच्या विचारात आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 2016 मध्ये रिलायन्स जिओ लॉन्च करून टेलिकॉम क्षेत्रात खळबळ उडवून दिली. आता ते म्युच्युअल फंड उद्योगातही अशीच खळबळ माजवण्याच्या तयारीत आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने अलीकडेच त्यांचा आर्थिक व्यवसाय वेगळा केला आहे आणि त्यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची वेगळी कंपनी स्थापन केली आहे. सोमवारी शेअर बाजारात त्याचे लिस्टिंगही झाले.
मुकेश अंबानी यांनी 2016 साली रिलायन्स जिओ लॉन्च करून दूरसंचार क्षेत्रात खळबळ माजवली. आज जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. त्याच्या ग्राहकांची संख्या 45 कोटींहून अधिक आहे. अंबानी आता वित्तीय सेवा क्षेत्रात मोठा सट्टा खेळण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्सने अलीकडेच आपला आर्थिक व्यवसाय वेगळा केला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिस्ट होताच देशातील तिसरी सर्वात मोठी NBFC कंपनी बनली.
JFSL ने कर्ज देणे तसेच विमा, पेमेंट, डिजिटल ब्रोकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायात स्वारस्य दाखवले आहे. कंपनीने अद्याप आपल्या व्यवसायाचा खुलासा केलेला नसला तरी, रिलायन्सची एजीएम 28 ऑगस्ट रोजी होणार आहे, ज्यामध्ये अंबानी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा रोडमॅप सांगू शकतात. ही कंपनी म्युच्युअल फंडात एंट्री मारू शकते, हे बाजारातील जानकारांचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे JFSL ने BlackRock या जगातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीसोबत एक करार केला आहे. BlackRock $8.4 ट्रिलियनचा निधी हाताळते, जो भारताच्या GDP च्या जवळपास तिप्पट आहे.
अंबानींच्या या निर्णयामुळे म्युच्युअल फंड कंपन्यां अलर्ट झाल्या आहेत. अंबानी यांनी या व्यवसायासाठी बँकिंग क्षेत्रातील दिग्गज केव्ही कामत यांना जोडले आहे. मुकेश अंबानी म्युच्युअल फंड व्यवसायात का उतरत आहेत, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर, भारतातील म्युच्युअल फंड उद्योग देशातील 44 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे व्यवस्थापन करत आहे. 2013 मध्ये ही रक्कम केवळ आठ लाख कोटी रुपये होती. म्हणजेच दहा वर्षांत पाचपट वाढ झाली आहे. एका रिपोर्टनुसार, भारतीय त्यांच्या बचतीपैकी केवळ 9.7% म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात. बहुतेक लोक मालमत्ता किंवा विम्यामध्ये गुंतवणूक करतात.
भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. 2028 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जर्मनी आणि जपानला मागे टाकू शकते. हळूहळू लोकांचे उत्पन्न वाढत आहे आणि त्यासोबतच लोकांचा कलही शेअर बाजाराकडे वाढत आहे. येत्या पाच वर्षात या उद्योगात बरीच वाढ दिसून येईल, असा विश्वास आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सुमारे साडेसहा कोटी लोक एसआयपी करतात. त्यांचा मासिक आकडा सुमारे 11,000 कोटी रुपये आहे. म्हणजेच, एसआयपीचा सरासरी आकार सुमारे 2200 रुपये आहे.
देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे आणि लोकांचा पैसा वाढत आहे, त्यामुळे हा उद्योग वाढेल आणि एसआयपीची रक्कमही वाढेल. मुकेश अंबानींना ही संधी सोडायची नाही, हे उघड आहे. म्युच्युअल फंड उद्योगात सध्या देशात 44 कंपन्या नोंदणीकृत आहेत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका आणि NBFC यांचा समावेश आहे. Zerodha आणि Paytm सारख्या स्टार्टअप कंपन्यांनीही यामध्ये प्रवेश केला आहे. परंतु 44 खेळाडूंपैकी, पहिल्या 10 खेळाडूंकडे फक्त 80 टक्के निधी आहे. यात कमालीची स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या मार्केटमध्ये तोच टिकू शकतो, जो वेगळे प्रोडक्ट आणेल. शिवाय, हे प्रोडक्ट परवडणारे आणि डिजिटली मजबूत असायला हवे. या सर्व अटी रिलायन्स पूर्ण करते. म्यूचुअल फंडमध्ये दोन प्रकारचे फंड असतात. अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह किंवा इंडेक्स फंड्स. अंबानी पॅसिव्ह फंडांवर डाव खेळू शकतात. कारण, हे परवडणारे आहे. टेलिकॉम सेक्टरप्रमाणे सुरुवातीला हे मोफत दिले जाऊ शकते. रिलायन्स जिओचे 45 कोटी ग्राहक आहेत. तसेच, देशभरात 15,000 पेक्षा जास्त स्टोअर आहेत. इतका मोठा युजर बेस असल्यामुळे मुकेश अंबानी या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत.