मुकेश अंबानींची लेक एक पाऊल पुढे; ईशा अंबानीनं बनवला नवा रेकॉर्ड, वर्षभरात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 19:40 IST2025-01-17T19:36:15+5:302025-01-17T19:40:22+5:30

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडनं नुकताच एक मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीने २०२४ मध्ये एका वर्षात म्हणजेच ३६५ दिवसांत ७७९ नवीन स्टोअर्स सुरू केले आहेत. या यशामध्ये रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळावर असलेल्या ईशा अंबानींचं योगदान खूप महत्त्वाचं ठरलं आहे. कंपनीच्या विस्तार धोरणांमध्ये ईशा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मागील वर्षभरात दिवसाला २ हून अधिक स्टोअर उघडण्यात आले, जो एक रेकॉर्डच मानावा लागेल. रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता कंपनी आहे. भारतभरातील विविध शहरांमध्ये रिलायन्सने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. देशभरात रिलायन्स रिटेल स्टोअर्सची संख्या आता १९ हजार १०२ इतकी झाली आहे.
मागील वर्षभरात २९ कोटी ६० लाख ग्राहकांनी रिलायन्स रिटेलमधून खरेदी केली. ईशा अंबानी यांनी आपल्या नेतृत्वाखाली कंपनीच्या विस्तार धोरणांना चालना दिली आहे, ज्यामुळे कमी वेळात कंपनीला यश मिळालं आहे. त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रिलायन्स रिटेलला अधिक कार्यक्षम बनवले ज्यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या सेवांचा अनुभव घेता येत आहे.
ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाच्या यशामुळे रिलायन्स रिटेलने किरकोळ व्यापार क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने ९०,३३३ कोटी महसूल जमवला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.८ टक्के अधिक आहे. कंपनीचा EBITIDA वाढून ६८२८ कोटी इतका झाला आहे.
रिलायन्स रिटेलच्या या कामगिरीवर भाष्य करताना रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, 'किरकोळ क्षेत्रातील सर्व फॉर्मेटमध्ये लक्षणीय योगदान देऊन रिटेलनं चांगली कामगिरी केली आहे. रिलायन्स रिटेल त्यांच्या विस्तारातून आणि वैविध्यपूर्ण उत्पादनातून ग्राहकांचा खरेदी करण्याकडे कल वाढवत आहे आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील असते असं त्यांनी सांगितले.
तर सण उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी होते त्यामुळे या तिमाहीत रिलायन्स रिटेलनं चांगली कामगिरी केली आहे. परवडणाऱ्या किंमतीत वैविध्यपूर्ण आणि उच्च दर्जाची उत्पादने देण्यावर आमचा भर असल्याने ग्राहकांना आमच्या स्टोअर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मकडे आकर्षित केले आहे असं सांगत रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनी आनंद व्यक्त केला.
रिलायन्स कंपनीने प्रत्येक कॅटेगिरीत उत्कृष्ट कामगिरी करून बाजारपेठेवरील आपली पकड कायम ठेवली. किराणा मालात वार्षिक ३७% वाढ नोंदली गेली तर ग्राहक इलेक्ट्रॉनिक्समध्ये १२% वार्षिक वाढ नोंदली गेली. फॅशन आणि लाइफस्टाइल पोर्टफोलिओमध्ये GAP आणि AJIO सारख्या ब्रँडने विक्रमी विक्री नोंदवली.
दुसरीकडे, खेळण्यांच्या ब्रँड हॅम्लीजनेही इटलीमध्ये ३ नवीन दुकाने उघडली. रिलायन्स रिटेल कंपनीचे कॅम्पा आणि इंडिपेंडन्स सारखे ब्रँड देखील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे.
ईशा अंबानी यांच्यामुळे रिलायन्स रिटेलने डिजिटल पायाभूत सुविधा, ई-कॉमर्स, आणि ऑनलाइन विक्रीच्या क्षेत्रातही मोठी भरारी घेतली आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली हजेरी दाखवून दिली. जिओमार्टसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन खरेदीच्या प्रक्रियेत क्रांतिकारी बदल घडवले आहेत. ग्राहकांना घरबसल्या सहजपणे खरेदी करण्याचा अनुभव मिळतो.
रिलायन्स रिटेलचा यशस्वी प्रवास आणि ईशा अंबानी यांचे दूरदृष्टी नेतृत्व यामुळे कंपनीने भारतीय बाजारपेठेवर आपली सशक्त पकड कायम ठेवली आहे. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने विविध नवकल्पना आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आपली कार्यक्षमता वाढवली आहे.