Multibagger Stock: ३६५ दिवसांत ₹१० हजारांचे बनले १ लाख; १० पट वेगानं धावणारा 'हा' शेअर कोणता, माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 08:39 AM2024-07-22T08:39:39+5:302024-07-22T08:48:49+5:30

Multibagger Stock: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. जाणून घेऊ अशाच एका शेअरबद्दल.

Multibagger Stock: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. तर असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. आज अशाच एका शेअरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना वर्षभरात १० पटींनं परतावा दिलाय.

गेल्या वर्षभरात राठी स्टील अँड पॉवरचे शेअर्स ९२५.६६ टक्क्यांनी वधारले आहेत. गुंतवणूकदारांसाठी हा शेअर मल्टिबॅगर ठरलाय. मुंबई शेअर बाजारात (BSE) कंपनीचे शेअर्स ७० रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहेत. या स्टील कंपनीचा शेअर गेल्या वर्षी अवघ्या ७ रुपयांवर होता. आता हा शेअर ७० रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना प्रचंड नफा झालाय.

NSE आणि BSE वर असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय आणि मल्टिबॅगर रिटर्नही दिलंय. आयर्न आणि स्टीलचं उत्पादन करणारी राठी स्टील अँड पॉवरचा शेअरही असाच आहे.

कंपनीच्या या शेअरनं उत्तम कामगिरी तर केलीच, शिवाय गुंतवणूकदारांचे पैसेही अनेक पटींनी वाढवले आहेत. कंपनीचं मार्केट कॅप ५९१.५३ कोटी रुपये आहे. कंपनीचे शेअर्स सध्या बीएसईवर ७० रुपयांपेक्षा कमी भावावर व्यवहार करत आहेत. शुक्रवारी हा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ६९.५४ रुपयांवर बंद झाला होता.

राठी स्टील अँड पॉवरचा शेअर वर्षभरापूर्वी केवळ ७ रुपयांवर व्यवहार करत होता. १९ जुलै २०२३ रोजी हा स्मॉल कॅप शेअर बीएसईवर ६.७८ रुपयांवर बंद झाला. त्यावेळी जर कोणी या शेअरमध्ये फक्त १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्यांची गुंतवणूक जवळपास १० पट म्हणजे १,०२,५०२ रुपये झाली असती.

स्मॉल कॅप शेअरमध्ये गेल्या आठवडाभरात ३१ टक्के तर गेल्या दोन आठवड्यात ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसई अॅनालिटिक्सच्या म्हणण्यानुसार, २०२४ च्या सुरुवातीपासून हा शेअर ६९ टक्क्यांनी वधारला आहे, तर वार्षिक आधारावर शेअर १२२ टक्क्यांनी वधारलाय.

वर्षभरात राठी स्टीलचा शेअर ९२५.६६ टक्क्यांनी वधारला आहे. राठी स्टील अँड पॉवर लिमिटेडची स्थापना १९७१ मध्ये झाली. ही कंपनी सळ्या आणि वायर रॉड तयार करते. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि ओडिशातील संबलपूर येथे कंपनीचे दोन उत्पादन युनिट आहेत.

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत स्मॉल कॅप कंपनीची निव्वळ विक्री ११८.३५ कोटी रुपये होती. तर कंपनीचा निव्वळ नफा २०.१३ कोटी रुपये होता. मार्च २०२३ तिमाहीतील ४.८७ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा हा ३०० टक्क्यांनी अधिक आहे. (टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)