Multibagger Stocks : १ लाखाचे झाले ३ कोटी; १० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअर्सनं दिले छप्परफाड रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 10:14 AM2022-02-19T10:14:45+5:302022-02-19T10:23:38+5:30

Multibagger Stocks : या दोन कंपन्यांच्या शेअर्सनं केलंय गुंतवणूकदारांना मालामाल.

Multibagger Stocks : अनेक जण शेअर बाजारात (Stock Market) मोठ्या परताव्यासाठी गुंतवणूक करत असतात. परंतु अनेकदा परतावा मिळेल किंवा आपलं नुकसान होईल याची शाश्वती शेअर बाजाराच्या गुंतवणूकीत देता येत नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना विचार करून किंवा तज्ज्ञांच्याच सल्ल्यानं गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

शेअर बाजारात असलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सनं गुतंवणूकदारांना मोठे रिटर्न दिले आहेत. १० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या २ शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न दिले आहेत.

या दोन शेअर्समध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्यांना मोठा फायदा झाला आहे. हे शेअर्स अजंता फार्मा (Ajanta Pharma) आणि नॅटको फार्मा (Natco Pharma) या कंपन्यांचे आहेत.

शेअर बाजारात या दोन कंपन्यांच्या शेअरची कामगिरी इतकी दमदार राहिली आहे की, एक लाख रुपये गुंतवणारी व्यक्ती आज कोट्यधीश झाली आहे. या शेअर्सनं गुंतवणूकदारांना २९,००० टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.

६ मार्च २००९ रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर अजंता फार्माचा शेअर ६.७१ रुपये होता. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स १९७२ रुपयांच्या च्या पातळीवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सनं १३ वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास २९,००० टक्के रिटर्न्स दिले आहेत.

जर एखाद्या व्यक्तीने ६ मार्च २००९ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर ती रक्कम सध्या २.९९ कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती.

कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,४३५ रुपये आहे. त्याच वेळी, ५२-आठवड्यांची नीचांकी पातळी १,६६० रुपये इतकी आहे.

६ मार्च २००९ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर नॅटको फार्माचे (Natco Pharma) शेअर्स ८.८१ रुपयांच्या पातळीवर होते. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स ८६६.७५ रुपयांवर बंद झाले.

कंपनीच्या शेअर्सनं १३ वर्षांपेक्षा कमी कालावधीत जवळपास १० हजार टक्के रिटर्न्स दिले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने ६ मार्च २००९ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील आणि तर आजच्या तारखेला ही रक्कम १ कोटी रुपयांच्या जवळपास झाली असती.

कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १,१८९ रुपये आहे. त्याच वेळी, ५२-आठवड्यांची नीचांकी पातळी ७७१.५० रुपये आहे.