मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दानाचा महापूर; इतिहासातील पहिल्यांदाच सर्व उच्चांक मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:01 IST2025-04-02T10:29:43+5:302025-04-02T11:01:02+5:30

Mumbai Siddhivinayak Temple Dan : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दर्शनसाठी वर्षभर रांगा पाहायला मिळतात. इथे बॉलिवूड सेलिब्रेटींपासून सर्वसामान्य सर्वजण गर्दी करतात.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देशातूनच नाही तर विदेशातूनही या मंदिराला नक्की भेट देतात. सर्वसामान्यांपासून ते अब्जाधीशांपर्यंत या मंदिरात दर्शनासाठी रांग लावतात. परिणामी या मंदिरात लोक भरभरुन दान करत असतात.

२०२४-२५ या आर्थिक वर्षात सिद्धिविनायक मंदिराने १३३ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली, जी आजपर्यंतची सर्वाधिक वार्षिक कमाई आहे.

बेला जयसिंघानी यांच्या अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये मंदिराला ११४ कोटी रुपये दान मिळालं होतं. तर २०२४-२५ मध्ये ही रक्कम १५% वाढून १३३ कोटी रुपये झाली. पुढील आर्थिक वर्षात म्हणजे २०२५-२६ मध्ये सिद्धिविनायक मंदिराचे वार्षिक उत्पन्न १५४ कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते असा अंदाज आहे.

या मंदिराला रोख रक्कम, ऑनलाइन व्यवहार आणि सोने-चांदीच्या माध्यमातून भाविकांकडून भरघोस उत्पन्न मिळाले, असे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच भाविकांची सातत्याने वाढणारी संख्या आणि ऑनलाइन देणगीच्या पर्यायांमुळे हे उत्पन्न वाढले आहे.

मंदिराला सोन्या-चांदीतून ७ कोटी दान मिळालं तर दानपेटीतून ९८ कोटी रोख, पूजा बुकिंग आणि प्रसाद यासारख्या इतर स्रोतांमधून १० कोटी मिळाले आहेत.

दरवर्षी गणेश चतुर्थी आणि इतर प्रसंगी बॉलीवूड स्टार्सपासून व्यावसायिकांपर्यंत लाखो भाविक सिद्धिविनायक मंदिराला भेट देतात. मात्र, सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे भारतातील इतर धार्मिक स्थळांनाही शेकडो कोटी रुपयांच्या देणग्या मिळतात. आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिराचे वार्षिक उत्पन्न सुमारे १५०० कोटी ते १६५० कोटी रुपये आहे, जे देणगी स्वरूपात मिळते.

तर केरळच्या पद्मनाभस्वामी मंदिराची कमाई दरवर्षी ७५० कोटी ते ८०० कोटी रुपयांपर्यंत असते. हे दान केलेले पैसे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मंदिराच्या देखभाल, सुरक्षा, विस्तारीकरण तसेच शिक्षण, वैद्यकीय सुविधा, गरीबांना मदत आणि सामाजिक कल्याणकारी योजनांसाठी वापरतात.