मस्क, बेझोस, अंबानी... सर्वांवर भारी पडले गौतम अदानी; एका फटक्यात कमावले २,४८,२५,६९,९०,००० रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 09:45 AM 2023-07-26T09:45:24+5:30 2023-07-26T09:53:48+5:30
. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मंगळवारी कमाईच्या बाबतीत जगातील सर्व अब्जाधीशांना मागे टाकलं. गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये चढउतार दिसून येत होता. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मंगळवारी कमाईच्या बाबतीत जगातील सर्व अब्जाधीशांना मागे टाकलं. अदानी समूहाच्या सर्व लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंगळवारी तेजी दिसून आली.
यामुळे समूहाच्या मार्केट कॅपमध्येही 50,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मंगळवारी अदानींची एकूण संपत्ती 3.03 अब्ज डॉलर म्हणजेच 2,48,25,69,90,000 रुपयांनी वाढली. अशाप्रकारे मंगळवारी ते सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश ठरले. यासह त्यांनी तीन स्थानांची झेप घेतली आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 19 व्या स्थानावर पोहोचले.
हिंडेनबर्ग रिसर्चचा मुद्दा आता मागे पडला असून देशांतर्गत गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये स्वारस्य दाखवण्यास सुरुवात केल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये दहा टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चनं 24 जानेवारीला अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता.
यामध्ये शेअर्सच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. अदानी समूहानं हे आरोप फेटाळले असले तरी त्यामुळे समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. हा अहवाल येण्यापूर्वी समूहाचं मार्केट कॅप 19.20 लाख कोटी रुपये होते, ते आता 10.6 लाख कोटी रुपये झालं आहे.
दरम्यान, जगातील सर्वात मोठे अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मंगळवारी 2.70 अब्ज डॉलरची घट झाली. आता त्यांची एकूण संपत्ती 236 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे बर्नार्ड अर्नॉल्ट, लॅरी एलिसन, वॉरेन बफे आणि कार्लोस स्लिम यांच्या निव्वळ संपत्तीतही मंगळवारी घट झाली.
जेफ बेझोस, बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मर, लॅरी पेज, मार्क झुकेरबर्ग, ब्रिन आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मंगळवारी वाढ झाली. मंगळवारी अंबानींच्या संपत्तीत 24.5 कोटी डॉलर्सची वाढ झाली. 95.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 12 व्या क्रमांकावर आहे. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 8.15 अब्ज डॉलर्सनं वाढली आहे.