तुमचे पैसे डबल करायचेत? तर SIP चा 'हा' सिक्रेट फॅार्मुला करा ट्राय, ₹१० हजारांचे बनू शकतील ₹२ कोटी
By जयदीप दाभोळकर | Updated: March 12, 2025 09:27 IST2025-03-12T09:17:35+5:302025-03-12T09:27:18+5:30
म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) गुंतवणुकीमुळे दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळते. एसआयपी दर महिना, आठवडा किंवा दररोज केली जाऊ शकते.

SIP Investment Plan: म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीची क्रेझ जबरदस्त आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये एसआयपी गुंतवणूक २६,००० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) गुंतवणुकीमुळे दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळते. एसआयपी दर महिना, आठवडा किंवा दररोज केली जाऊ शकते.
दीर्घकालीन एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना कंपाउंडिंगचा फायदा मिळतो. त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे टॉप-अप एसआयपी. म्हणजेच मासिक एसआयपीसोबत दर वर्षी ठराविक रक्कम जोडली तर तुमचा कॉर्पस दुप्पट होऊ शकतो. त्यामुळे तुम्हालाही तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्हालाही एसआयपीचा हा सिक्रेट फॉर्म्युला अवलंबता येऊ शकतो.
टॉप-अप एसआयपी म्हणजे तुम्ही १०,००० रुपये मासिक एसआयपीचा पर्याय निवडला असेल. तसा तुमचा पगार दरवर्षी वाढत गेला तर त्या प्रमाणात तुम्ही एसआयपीमध्ये दरवर्षी काही रक्कम टॉपअपही करू शकता. हे आपण हिशोबाने समजून घेऊया
जर आपण महिन्याला १० हजार रुपयांची एसआयपी केली तर २० वर्षांत तुमची एकूण २४ लाख रुपयांची गुंतवणूक होईल. यावर अंदाजे १२ टक्के परतावा मिळतो असं समजूया. यानुसार तुम्ही २० वर्षांनंतर एकून ९९ लाख ९१ हजार रूपयांचा निधी उभा करू शकता. म्हणजेच तुम्हाला ७५ लाख ९१ हजार रुपयांचं प्रॉफिट मिळू शकतं.
तर दुसरीकडे जर तुम्ही महिन्याला १० हजार रुपयांची एसआयपी केली आणि त्यात वर्षाला १० टक्क्यांची वाढ केली, तर तुमची एकूण गुंतवणूक ६८.७३ लाख रुपये होईल. तुमचा २० वर्षांनंतर एकूण १.९९ कोटी म्हणजे जवळपास २ कोटी रुपयांचा निधी उभा होऊ शकतो. यामध्ये १ कोटी ३० लाख रुपयांच्या नफ्याचा समावेश आहे.
तज्ज्ञांच्या मते, रेग्युलर एसआयपीसोबत टॉप-अप एसआयपीचा फॉर्म्युला तुम्हाला जबरदस्त फायदे देऊ शकतो. खरं तर, टॉप-अप एसआयपी ही एक अशी सुविधा आहे ज्यामध्ये आपण दरवर्षी आपल्या नियमित एसआयपीमध्ये काही रक्कम जोडू शकता. उदाहरणार्थ, तुमचा पगार दरवर्षी वाढत असल्यानं त्या प्रमाणात तुम्ही एसआयपीमध्येही काही रक्कम दरवर्षी टॉप अप करू शकता. टॉप-अप एसआयपीआपल्याला आपल्या गुंतवणुकीची उद्दीष्टे त्वरीत आणि सहजपणे पूर्ण करता येतात.
(टीप - यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)