Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 09:11 AM 2024-05-07T09:11:35+5:30 2024-05-07T09:27:06+5:30
Raymond Gautam Singhania : गेल्या काही महिन्यांपासून रेमंड समूहाचे सीएमडी गौतम सिंघानिया आणि त्यांचे वडील विजयपत सिंघानिया, पत्नी नवाज मोदी यांच्यातील वाद सर्वांसमोर आला आहे. दरम्यान, गौतम सिंघानिया यांनी आता यावर भाष्य केलंय. Raymond Gautam Singhania : गेल्या काही महिन्यांपासून रेमंड समूहाचे सीएमडी गौतम सिंघानिया आणि त्यांचे वडील विजयपत सिंघानिया, पत्नी नवाज मोदी यांच्यातील वाद सर्वांसमोर आला आहे. दरम्यान, गौतम सिंघानिया यांनी आता यावर भाष्य केलंय. "आपल्या वैयक्तिक जीवनाचा आपल्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही. आमच्यादरम्यान जे काही झालं, त्यावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मला पूर्णपणे व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि मी निकालांवर लक्ष ठेवेन," असं गौतम सिंघानिया म्हणाले.
गौतम सिंघानिया यांनी १३ नोव्हेंबर २०२३ रोजी पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यापासून विभक्त होण्याची घोषणा केली होती. अलीकडेच रेमंड ग्रुपच्या तीन कंपन्यांनी नवाज मोदी यांना त्यांच्या संचालक मंडळातूनही काढण्याचा निर्णय घेतला होता.
जेके इन्व्हेस्टर्स लिमिटेड (JKI), रेमंड कन्झ्युमर केअर (RCCL) आणि स्मार्ट अॅडव्हायझरी अँड फिनसर्व्हनं ३१ मार्च रोजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंगद्वारे (EGM) नवाज मोदी यांना संचालक मंडळातून काढण्याचा निर्णय घेतला होता. काही कंपन्यांनी विश्वासाची कमतरता असल्यानं त्यांना संचालक मंडळातून काढण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. सिंघानिया यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं.
"सर्वच व्यवसाय प्रगती करत आहेत. माझं खासगी आयुष्य माझं खासगी आहे, मी त्याचा सामना करेन. माझ्या दोन मुली आहेत आणि त्यांचं हित पाहता मी भाष्य करण्यास नकार दिला. माझ्या खासगी जीवनाचा व्यवसाय क्षेत्रातील कोणाशीही संबंध नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
१०००० कोटींचा रेमंड ग्रुप तेजीनं पुढे जात आहे. यात लाईफस्टाईल डिव्हिजन- अपेरल आणि फॅब्रिक यांचा प्रमुख वाटा आहे असं सांगत त्यांनी ऑर्गनायझेशन रिस्ट्रक्चरबाबतही वक्तव्य केलं. "आम्ही कंपनीत काही बदल केले आहेत आणि आमच्याकडे मजबूत गव्हर्निंग बोर्ड आ हे. गेल्या ३६ महिन्यात आमच्या बोर्डात नवीन सदस्य आलेत. आमच्या प्रत्येक व्यवसायासाठी सीईओ आहेत आणि व्यवसाय वाढवण्यासाठी नंतर त्यांना स्टॅटिक्स बिनझनेस युनिटमध्ये विभागलं जाईल," असं सिंघानिया म्हणाले.
रिपोर्टनुसार, गौतम सिंघानिया यांच्या विभक्त होण्याच्या घोषणेनंतर नवाज मोदी यांनी विभक्त होण्यासाठी एक अट घातली आहे. त्यांनी १.४ अब्ज डॉलरच्या (सुमारे ११ हजार कोटी रुपये) एकूण मालमत्तेत ७५ टक्के हिस्सा मागितला आहे. त्यानंतर गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरला बीएसईवर रेमंडचा शेअर १,६६६ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर या शेअरमध्ये सुधारणा दिसून आली. त्यानंतर पुन्हा एकदा कंपनीचा शेअर २००० रुपयांच्या वर पोहोचलाय.
गौतम सिंघानिया हे रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची नेटवर्थ जवळपास ११ हजार कोटी रुपये आहे. रेमंड ग्रुपकडे क्लोथ, डेनिम, कन्झ्युमर केअर, इंजिनिअरिंग आणि रिअल इस्टेटसह इतर व्यवसाय आहेत. रेडिमेड कपड्यांच्या बाजारपेठेत या ग्रुपची स्थिती भक्कम आहे.
नवाज मोदी यांचे वडील लग्नासाठी तयार नव्हते असं गौतम सिंघानिया यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. "पारशी मुलीला पत्नी बनवणे सोपं नव्हतं. नवाज यांचे वडील लग्नासाठी तयार नव्हते, पण मुलीच्या आग्रहापुढे त्यांना झुकावं लागलं. लग्नानंतरही सांस्कृतिक फरक असल्यामुळे अनेक बदल करावे लागले," असंही त्यांनी म्हटलं होतं.
गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांच्याशीही वाद झाले होते. गौतम सिंघानिया यांच्यावर वडिलांना घराबाहेर काढल्याचा आरोप आहे. विजयपत सिंघानिया यांनी रेमंड्स कंपनी उभी केली होती.