फॅशनच्या जगतात कमावलं नाव; कोण आहे पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू, किती आहे नेटवर्थ?

By जयदीप दाभोळकर | Updated: March 11, 2025 09:26 IST2025-03-11T09:17:26+5:302025-03-11T09:26:43+5:30

Pakistan Richest Hindu: पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनं नुकतीच २०२३ ची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांच्या मते पाकिस्तानात हिंदू हा सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक समुदाय आहे.

Pakistan Richest Hindu: पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनं नुकतीच २०२३ ची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांच्या मते पाकिस्तानात हिंदू हा सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक समुदाय आहे. पाकिस्तानात सुमारे ५२ लाख हिंदू राहतात, जे एकूण लोकसंख्येच्या २.१७ टक्के आहे. यातील बहुतांश सिंध प्रांतात राहतात, जिथे हिंदूंची लोकसंख्या सुमारे ४९ लाख आहे.

दरम्यान, प्रामुख्यानं कला, संस्कृती आणि व्यवसाय या सारख्या क्षेत्रात अल्पसंख्याक हिंदू झपाट्यानं प्रगती करत आहेत, ही आकडेवारी या परिस्थितीचे द्योतक आहे. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू व्यक्ती म्हणजे दीपक पेरवानी. त्यांचा व्यवसाय काय आणि त्यांची कारकीर्द तसंच नेटवर्थ यावर एक नजर टाकू.

दीपक पेरवानी हे पाकिस्तानातील हिंदू समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. १९७४ मध्ये मीरपूर खास येथे सिंधी हिंदू कुटुंबात जन्मलेल्या पेरवानी यांनी फॅशन डिझायनर आणि अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. १९९६ मध्ये त्यांनी स्वत:चं फॅशन हाऊस 'डीपी (दीपक पेरवानी)' सुरू केलं.

वधू आणि औपचारिक वेशभूषेत त्यांचा ब्रँड पारंगत होता. स्थानिक आणि जागतिक स्तरावर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. २०१४ मध्ये बल्गेरियन फॅशन अवॉर्ड्समध्ये त्यांची जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट फॅशन डिझायनर म्हणून निवड करण्यात आली होती.

पेरवानी यांना सात लक्स स्टाइल पुरस्कार, पाच बीएफए पुरस्कार आणि इंडस स्टाइल गुरु पुरस्कार मिळाले आहेत. जगातील सर्वात मोठा कुर्ता तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवल्यामुळेही ते चर्चेत होते. हे त्यांचं कौशल्य, नाविन्य आणि त्यांच्या प्रतभेसाठी आंतरराष्ट्रीय कौतुक दर्शवितं.

पेरवानी यांच्या कार्याची ओळख पाकिस्तानबाहेरही आहे. भारतीय गीतकार जावेद अख्तर आणि त्यांची अभिनेत्री पत्नी शबाना आझमी यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींसोबत त्यांनी काम केलं आहे. चीन, मलेशिया सारख्या देशांना त्यांनी पाकिस्तानच्या संस्कृतीची ओळख करून दिली आहे.

परवानी हे पाकिस्तानातील हिंदू समाजातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. २०२२ च्या मीडिया रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे ७१ कोटी रुपये होती. त्यांचा चुलत भाऊ नवीन पेरवानी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्नूकर खेळाडू आहेत. अंदाजे ६० कोटी रुपयांच्या संपत्तीसह ते सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.