ना IIT ना IIM, पतीनं सोडली नोकरी; नंतर दोघांनी मिळून उभी केली ₹८००० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 09:32 AM2023-09-04T09:32:13+5:302023-09-04T10:12:30+5:30

यशस्वी उद्योजक महिलांच्या या यादीत आणखी एक मोठं नाव म्हणजे उपासना टाकू.

फाल्गुनी नायर, विनिता सिंग, ईशा अंबानी, जयंती चौधरी... ही यादी फार मोठी आहे. फॅशन इंडस्ट्रीपासून तंत्रज्ञान क्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. यशस्वी उद्योजक महिलांच्या या यादीत आणखी एक मोठं नाव म्हणजे उपासना टाकू.

उपासना या त्या उद्योजक महिलांपैकी आहे, ज्या फिनटेक मार्केटचं नेतृत्व करतात. उपासना टाकू या मोबिक्विकच्या सीईओ आहेत. त्यांनी इंजिनिअरिंगही केलंय. त्यांनी पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंगची डिग्री केली. त्यांनंतर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंट सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय.

उपासना यांनी १७ वर्षांहून अधिक काळ संबंधित क्षेत्रात काम केलंय. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी अमेरिकन पेमेंट फर्म PayPal साठी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलंय. त्यांनी एचएसबीसीमध्येही काम केलंय. त्या आधी अमेरिकेत वास्तव्यास होत्या. पण, २००८ मध्ये स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी त्या भारतात परतल्या.

भारतात जितक्या समस्या आहेत, तितकीच संधीही आहे, असं फोर्ब्सला दिलेल्या एका मुलाखतीत उपासना यांनी सांगितलं होतं. भारतासाठी उत्तम ठरेल असा व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना भारतात परण्याच्या निर्णयाचा विरोध केला होता. हे अतिशय जोखमीचं ठरू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे.

उपासना यांचे आई-वडील तेव्हा आफ्रिकेत राहत होते. त्यांचे वडील इरिट्रियातील अस्मारा विद्यापीठात फिजिक्सचे प्रोफेसह होते. तर त्यांची आई म्युझिशियन होती. २००९ मध्ये उपासना भारतात परतल्या. त्यांनी पे पॅल ची नोकरी सोडली. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना पुढे काम करण्याची इच्छा होती.

उपासना टाकू यांच्याकडे मोठं घर, कार आणि अन्य सुखसुविधा होत्या. त्यांनी परत आल्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या मायक्रोफायनान्स एनजीओ दृष्टीसाठी काम सुरू केलं.

उपासना आणि त्यांचे पती बिपिन सिंह यांची २००८ मध्ये भेट झाली. २०११ मध्ये त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. २००८ मध्ये मोबिक्विकचे सह-संस्थापक बिपिन सिंह यांनी आपल्या प्लॅटफॉर्मसाठी कॉन्सेप्ट विकसित केला होता.

बिपिन यांना आपली नोकरी सोडणं शक्य नव्हतं. त्यांच्यावर आपल्या कुटुंबीयांची मोठी जबाबदारी होती. उपासना यांनी त्यांना पाठींबा देत नोकरी सोडून आपलं स्टार्टअप सुरू करण्यास पाठिंबा दिला. त्यांनी मिळून २००९ मध्ये आपला व्यवसाय सुरू केला.