आता 'या' लाईफ इन्शुरन्स पॉलिसीतून मिळणाऱ्या रकमेवर लागणार टॅक्स, आला नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 09:33 AM2023-08-17T09:33:22+5:302023-08-17T09:39:22+5:30

Tax in Life Insurance Policy : जीवन विमा पॉलिसीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना करण्यासाठी आयकर विभागानं नियम तयार केले आहेत.

Tax in Life Insurance Policy : वार्षिक प्रीमियम पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास जीवन विमा पॉलिसीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना करण्यासाठी आयकर विभागानं नियम तयार केले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयकर कायदा (सोळावी सुधारणा), २०२३ अधिसूचित केला आहे.

यामध्ये, जीवन विमा पॉलिसीच्या मुदतपूर्तीवर प्राप्त झालेल्या रकमेच्या संदर्भात उत्पन्नाची गणना करण्यासाठी नियम ११यूएसीए निर्धारित करण्यात आला आहे.

ही तरतूद अशा विमा पॉलिसींसाठी आहे ज्यात प्रीमियमची रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय अशी पॉलिसी १ एप्रिल २०२३ रोजी किंवा नंतर जारी केली गेली असेल त्यासाठी हा नियम आहे.

सुधारणेनुसार, १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या पॉलिसींसाठी, कलम १०(10D) अंतर्गत मॅच्युरिटी फायद्यांवर कर सवलत फक्त तेव्हाच लागू होईल जेव्हा एखाद्या व्यक्तीनं भरलेला एकूण प्रीमियम वार्षिक पाच लाखांपेक्षा जास्त नसेल. या मर्यादेपेक्षा अधिक प्रीमियमसाठी प्राप्त झालेली रक्कम उत्पन्नात जोडली जाईल आणि लागू दरांनुसार कर आकारला जाईल.

पाच लाखांहून अधिक प्रीमियम भरल्यास त्याची गणना उत्पन्नातून केली जाईल आणि लागू दरानं कर आकारला जाईल. २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात युलीप (ULIP) वगळता जीवन विमा पॉलिसींच्या संबंधात कर तरतुदीतील बदल जाहीर करण्यात आले होते.

पाच लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियमवर भरलेल्या रकमेतून मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना केल्यानंतर कर आकारला जाईल. हा कर मॅच्युरिटीवर मोजला जाईल आणि त्यानंतर संपूर्ण रक्कम दिली जाणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली.

त्याचवेळी, आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या प्रीमियमच्या रकमेवर कर लावला जाणार नाही.