१ सप्टेंबरपासून लागू होणार नवे नियम, बनावट कॉल-मेसेजेसला आळा बसणार; आणखी कोणत्या गोष्टींवर होणार परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 09:18 AM 2024-08-24T09:18:31+5:30 2024-08-24T09:25:31+5:30
१ सप्टेंबरपासून तुमच्याशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत. यात क्रेडिट कार्डच्या नियमांपासून ते फेक कॉल्सपासून सुटका मिळवण्यापर्यंतचा समावेश आहे. जाणून घ्या कोणत्या गोष्टींवर होणार परिणाम. १ सप्टेंबरपासून तुमच्याशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत. यात क्रेडिट कार्डच्या नियमांपासून ते फेक कॉल्सपासून सुटका मिळवण्यापर्यंतचा समावेश आहे. खरं तर प्रत्येक महिन्याच्या तारखेला अनेक बदल होत असतात. यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीपासून इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो.
अनेक सरकारी आणि बिगरसरकारी कंपन्याही आपले नियम बदलतात. यातील बहुतांश नियम महिन्याच्या तारखेपासून बदलतात. यंदाही १ सप्टेंबरपासून अनेक नियम बदलत आहेत. तुम्हाला या नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांवर होत असतो.
१ सप्टेंबरपासून फेक कॉल आणि मेसेजेसला आळा बसेल. काही दिवसांपूर्वी ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना फेक कॉल आणि फेक मेसेजला आळा घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. फेक कॉल आणि मेसेजवर बंदी घालण्यासाठी ट्रायनं पुन्हा एकदा कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जिओ, एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल आदी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत १४० मोबाइल नंबर सिरीजपासून सुरू होणारे टेलिमार्केटिंग कॉल्स आणि कमर्शियल मेसेजिंग ब्लॉकचेन बेस्ड डीएलटी म्हणजेच डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करावे लागणार आहेत. त्यानंतर १ सप्टेंबरपासून या नंबरवरून येणारे फेक कॉल आणि मेसेजेस बंद होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एचडीएफसी क्रेडिट कार्ड : जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला अधिक लक्ष देण्याची गरज आहे. एचडीएफसी बँकेनं युटिलिटी ट्रान्झॅक्शनवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंट्सची मर्यादा निश्चित करणार असल्याचं म्हटलं आहे. यानुसार, एचडीएफसी क्रेडिट कार्ड ग्राहकांना दरमहा युटिलिटी ट्रान्झॅक्शनमध्ये फक्त २००० पॉईंट्स मिळतील. एचडीएफसी बँक यापुढे थर्ड पार्टी अॅप्सद्वारे एज्युकेशन पेमेंटसाठी रिवॉर्ड पॉईंट्स देणार नाही.
IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड - आयडीएफसी फर्स्ट बँक देखील १ सप्टेंबरपासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेनं क्रेडिट कार्डवरील किमान रक्कम आणखी कमी करणार असल्याचं म्हटलं आहे. यामुळे कार्डधारकाला पैसे भरणं सोपं होईल. तसेच, बँकेनं पेमेंटची तारीख कमी केली आहे. बँकेनं पैसे भरण्याची मुदत १८ वरून १५ दिवसांवर आणलीये.
मागे बसणाऱ्यासाठी हेल्मेट अनिवार्य - कोणत्याही प्रकारच्या दुचाकीवर (स्कूटर किंवा दुचाकी) मागे बसणाऱ्याला हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आले आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत हा नियम यापूर्वीच लागू करण्यात आला असला तरी अनेक शहरांमध्ये त्याचं पालन केलं जात नाही. आता आंध्र प्रदेशातील मोठे शहर विशाखापट्टणममध्ये १ सप्टेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. या नव्या नियमांतर्गत आता दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत हेल्मेट परिधान करावे लागणार आहे. जर कोणी हा नियम पाळला नाही तर १०३५ रुपयांचं चालान कापलं जाईल. तसेच परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो.
एलपीजीचे दर दर महिन्याच्या १ तारखेला सुधारित केले जातात. मात्र, एलपीजी सिलिंडरची किंमत वाढेल किंवा कमी होईल, याची गरज नाही. इंधन कंपन्या दर महिन्याला दरांमध्ये सुधारणा करत असतात. गेल्या महिन्यात १ ऑगस्ट रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ८.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.