Nithin Kamath Zerodha : कसा झिरो बनला आवडता शब्द; नितीन कामथ यांनी सांगितलं कसं आहे झिरोदाचं बिझनेस मॉडेल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 01:44 PM2023-03-09T13:44:01+5:302023-03-09T13:53:30+5:30

झिरोदा ही देशातील सर्वात मोठी ब्रोकिंग फर्म आहे.

ऑनलाइन ब्रोकिंग फर्म झिरोदाचे सीईओ नितीन कामथ आणि चीफ टेक्निकल ऑफिसर (CTO) कैलाश नाड यांनी आपल्या फर्मने झीरो लॉस, झिरो फंडिंग, झिरो लोन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे झिरो ब्रोकरेज फी सोबत आपलं नाव कसं मोठं केलं यासंदर्भातील आपला प्रवास सर्वांसोबत शेअर केला आहे.

कामथ आणि नाड यांनी कंपनीचं कर्जमुक्त, विना कोणतंही फंडिंग आणि फायदेशीर स्थान यामुळे झिरोदातील 'झिरो' हा आवडता शब्द कसा आहे याबद्दल एक रंजक किस्सा सांगितला. मनी कंट्रोलच्या पहिल्या इंडिया फिनटेक कॉनक्लेव्हमध्ये ते सहभागी झाले होते.

कंपनीनं हे कसं साध्य केलं, असं असा प्रश्न त्यांना यादरम्यान विचारण्यात आला. व्यवसाय सुरू करताना कोणतीही मोठी महत्त्वाकांक्षा नव्हती. क्लायंट जोडण्यासाठी जाहिरातींवर कोणताही पैसा खर्च न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आणि माऊथ पब्लिसिटीवर विश्वास ठेवला, असं कामथ यावेळी म्हणाले.

गुंतवणूक काढण्यासाठी कोणतीही एक्झिट स्ट्रॅटजी नसल्याच्यादरम्यान कोणत्याही गोष्टीवर खर्च न करण्याच्या त्यांच्या विचारामुळेच व्यवसाय सुरू केल्यानंतर केवळ तीन वर्षांच्या आतच तो नफ्यात आला.

कंपनीच्या उभारणीत नाड यांच्या प्रमुख योगदानाची कबुली कामथ यांनी यावेळी दिली. नाड यांच्या नेतृत्वाखाली झिरोदानं २०१५ मध्ये आपले इन-हाऊस ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सुरू केले आणि ग्राहकांकडून त्याचं स्वागत झालं. हा एक चांगला क्षण होता आणि झिरोदा बाजारात दीर्घकाळ राहण्यासाठी येथे असल्याचे आपल्याला पहिल्यांदा समजले, असं कामथ यांनी नमूद केलं.

दरम्यान, त्याच वर्षी झिरोदानं आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे इक्विटीत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीवरील ब्रोकरेज फी संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांच्या या निर्णयाचंही कौतुक झालं होतं.

झिरोदाची टेक्नॉलॉजी बनवताना ज्या नियमांचं पालन करण्यात आलं, त्याबाबत नाड यांनी माहिती दिली. गोष्टी अतिशय सोप्या असल्या पाहिजे आणि FOMO पासून वाचण्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवायला हवा, हा पहिल्या नियमांपैकी एक होता, असंही त्यांनी सांगितलं.

अनेक कंपन्या तेजीनं वाढण्यासाठी अनेक गोष्टी तयार करतात. ग्राहकांसाठी सोप्या गोष्टी तयार करण्यावर आमचा विश्वास होता. त्यामुळे आम्ही मनमर्जीनं नव्या गोष्टी आणण्यात घाई केली नसल्याचंही नाड यांनी स्पष्ट केलं.

बाजार नियामक सेबी नियमितपणे फिनटेक कंपन्यांवर कारवाई करत आहे. परंतु नाड यांना त्याची चिंता नाही. झिरोदाचा दृष्टीकोन कन्झर्व्हेटिव्ह आहे, जो नियामकाच्या तत्वांशी मेळ खातो. नियमकाच्या पुढे विचार करणं ही आमच्यासाठी खरोखर सांस्कृतिक गोष्ट बनली असल्याचंही ते म्हणाले.

यावेळी कामथ यांना आयपीओ आणण्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. असं करण्यात अजून वेळ आहे. जर एखाद्या दिवशी आम्हाला असं वाटलं की आम्ही पुरेशी उत्पादनं तयार केली आहेत आणि भांडवली बाजारावरील अवलंबित्व वाढलं आहे, तर आम्ही आयपीओचा विचार करू, असं कामथ यांनी स्पष्ट केलं.