केवळ १२ लाखांपर्यंतच उत्पन्नच टॅक्स फ्री झालं नाही, सामान्यांची झालीये चांदी; Tax बाबतही झाले ७ बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 09:11 IST2025-02-04T08:58:10+5:302025-02-04T09:11:59+5:30
Tax Rules Nirmala Sitharaman Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्यात. सरकारनं कराबाबत दिलासा दिलाच आहे, पण अशा ७ घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेची चांदी झालीये.

Tax Rules Nirmala Sitharaman Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेमुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळालाय. अर्थमंत्र्यांनी १२ लाखरुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलंय. त्याची सर्वत्र चर्चा आहे. पण सरकारनं कराबाबत दिलासा दिलाच आहे, पण अशा ७ घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेची चांदी झालीये.
६ लाखांपर्यंतच्या भाड्यावर TDS नाही
भाड्याच्या उत्पन्नावरील टीडीएसची मर्यादा २.४ लाखांवरून ६ लाख करण्यात आली आहे. म्हणजेच आता ६ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक भाड्यावर टीडीएस कापला जाणार नाही.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील टीडीएस वजावटीची मर्यादा ५० हजार रुपये होती, ती आता वाढवून एक लाख रुपये करण्यात आली आहे. याचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
शिक्षणासाठीही मोठी घोषणा
आतापर्यंत शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी सात लाखरुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करण्यावर पाच टक्के कर (TCS) भरावा लागत होता. पण आता तुम्ही तुमच्या मुलांची फी किंवा परदेशात शिकणाऱ्या इतर खर्चासाठी १० लाख रुपये पाठवले तर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. दुसरीकडे पालक बँक किंवा कोणत्याही अधिकृत संस्थेकडून कर्ज घेऊन मुलांच्या कॉलेजची फी भरत असतील तर टीसीएस कापला जाणार नाही.
गेल्या ४ वर्षांचा रिटर्न भरता येणार
या अर्थसंकल्पात जुने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मर्यादा वाढवण्याची ही घोषणा करण्यात आली आहे. आता तुम्हाला गेल्या ४ वर्षांचं रिटर्न भरता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २ वर्षे होती. म्हणजेच जर एखाद्या करदात्यानं आपलं इन्कट टॅक्स रिटर्न चुकीच्या पद्धतीने भरलं असेल किंवा भरता आलं नसेल तर तो ४ वर्षांच्या आत अपडेटेड रिटर्न दाखल करून ही चूक सुधारू शकतो.
दोन घरांना सेल्फ ऑक्युपाइड हाऊसचा फायदा
अर्थसंकल्पात सेल्फ ऑक्युपाईड घरांवरही करसवलत देण्यात आली आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे दोन घरं असतील आणि तुम्ही दोन्ही घरांमध्ये राहत असाल तर आता तुम्ही दोन्ही मिळकतींवर कराचा लाभ घेऊ शकाल. पूर्वी ही सूट एकाच घरावर होती.
NSS मधून पैसे काढण्यावर सूट
अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की ज्यांची जुनी राष्ट्रीय बचत योजना (एनएसएस) खाती आहेत, ज्या खात्यांमध्ये यापुढे व्याज मिळत नाही, त्यात ऑगस्ट २०२४ नंतर काढलेली रक्कम करमुक्त असेल. देशातील अनेक ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिकांची जुनी एनएसएस खाती आहेत, ज्यावर व्याज मिळत नाही. यातून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवं आयकर विधेयक येणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सरकार पुढील आठवड्यात नवं आयकर विधेयक आणणार असल्याची घोषणा केली. यामुळे करप्रणाली सुलभ आणि पारदर्शक होईल.