आता घरीच मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवता येणार, बँक लॉकरची गरजच नाही! कसं ते जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 02:52 PM 2022-09-19T14:52:02+5:30 2022-09-19T15:00:15+5:30
तुमच्याकडे सोन्याचे आणि हिऱ्याचे मौल्यवान दागिने असतील आणि ते सुरक्षित राहावेत यासाठी पहिला पर्याय म्हणजे बँक लॉकरचा आपण विचार करतो. पण आपल्याला जेव्हा दागिने हवे असतात तेव्हा बँकेच्या खेटा घालाव्या लागतात. त्यामुळे वैताग येतो. पण आता तुम्ही घरीच दागिने सुरक्षित ठेवू शकणार आहात. जर घरात ठेवलेले दागिने सुरक्षित आहेत की नाही अशी भीती नेहमीच प्रत्येकाला असते. अशा परिस्थितीत दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकरची निवड करतो. कारण घरात ठेवलेले दागिने चोरीला जाऊ नयेत याची काळजी आपण घेतो. पण बँक लॉकरमध्ये दागिने ठेवणं प्रत्येकासाठी सहज शक्य नसतं.
दागिने घरी ठेवण्याची प्रथा अजूनही उपनगरी भागात आहे. दागिने घरात ठेवल्यानं चोरीची शक्यता वाढते. दागिने घरात ठेवण्यासाठी काय करावे जेणेकरून तुमचे दागिने सुरक्षित राहतील. हे जाणून घेऊयात...
आता तुम्ही लॉकर न घेता तुमचे दागिने घरीच सुरक्षित ठेवू शकता. तुम्ही दागिन्यांची विमा पॉलिसी काढू शकता जेणेकरून दागिने चोरीला जाणे, घरातून गायब होणे अशा वेळी तुम्हाला आर्थिक नुकसानीची चिंता करावी लागणार नाही.
विमा कंपन्या दागिन्यांच्या संरक्षणासाठी दोन प्रकारच्या पॉलिसी देतात. एक स्टँडअलोन ज्वेलरी पॉलिसी आणि दुसरी होम इन्शुरन्स पॉलिसी. गृह विमा पॉलिसींना काही मर्यादा असतात.
जर तुम्ही गृह विमा पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षण घेतलं असेल आणि घरातून दागिने चोरीला गेले असतील तर दागिन्यांची पूर्ण किंमत परत मिळत नाही. त्यामुळे दागिन्यांच्या संपूर्ण संरक्षणासाठी स्वतंत्र दागिन्यांची विमा पॉलिसी घ्यावी. ही पॉलिसी दागिन्यांसाठी संपूर्ण विमा संरक्षण प्रदान करते.
ज्वेलरी इन्शुरन्स पॉलिसी घेण्यापूर्वी दागिन्यांचे बाजारमूल्यांकन करून घ्या. तुम्हाला ते जवळपासच्या कोणत्याही अधिकृत दागिन्यांच्या दुकानातून मिळेल. अन्यथा, विमा दावा करताना विमा कंपनी तुमच्या दागिन्यांचे मूल्यांकन कमी करू शकते, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
प्रिमियम किती? दागिन्यांच्या विम्याचा हप्ता फारसा खर्चीक नाही. विमा कंपन्या दागिन्यांच्या विम्यासाठी १ लाख रुपयांच्या विमा रकमेवर १ हजार रुपये प्रीमियम आकारतात. म्हणजेच, जर तुमच्याकडे १० लाख रुपयांचे दागिने असतील तर तुम्हाला वार्षिक १० हजार रुपये प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही एकाच वेळी इतर वस्तूंचे कव्हर घेतल्यास, विमा कंपनी प्रीमियममध्ये सूट देखील देते.
'या' गोष्टींवर ठेवा विशेष लक्ष दागिन्यांसाठी पॉलिसी घेण्यापूर्वी, त्याचे परतावा नियम-अटी नीट वाचून घ्या. विमा कंपनीची परतावा पॉलिसी काय आहे? दागिने गहाळ झाल्यास, दावा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रक्रियेचे पालन करावं लागेल याची माहिती घ्या. त्यानंतरच पॉलिसी घेण्याचा निर्णय घ्या.
ज्वेलरी पॉलिसीमध्ये आग आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई दिली जाते. म्हणून, सर्वप्रथम तुम्हाला पॉलिसीचे नियम चांगले माहित असले पाहिजेत, त्यानंतरच पॉलिसी घेण्याचा निर्णय घ्यावा.