आता घरबसल्या काढता येणार पीएफचे पैसे, जाणून घ्या प्रोसेस By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:39 AM 2022-01-28T11:39:32+5:30 2022-01-28T11:48:35+5:30
आता पीएफ आपत्कालीन परिस्थितीतही काढता येणार आहे. अडचणीत असलेल्यांना त्याचा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला जमा होणारी रक्कम निवृत्तीच्या वेळी मिळते.
याचा मोठा फायदा उतारवयात होतो. आता पीएफ आपत्कालीन परिस्थितीतही काढता येणार आहे. अडचणीत असलेल्यांना त्याचा फायदा होणार आहे.
कोरोनाच्या काळात अनेकांना पैशांची जास्त गरज होती. या दरम्यान, ईपीएफओमुळे कोविड ॲडव्हान्स काढणे लोकांना फायदेशीर ठरले. जर तुम्हीही कोविडमुळे त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून काही रक्कम काढू शकता.
पीएफ काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही कोविड ॲडव्हान्स काढू शकता. ईपीएफओने ट्विट करून याबाबतची माहिती दिली.
ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, तुम्ही घरबसल्या उमंग ॲपद्वारे कोविड ॲडव्हान्स काढू शकता. उमंग ॲपवर ईपीएफओकडून अनेक सेवा दिल्या जातात. यामध्ये शिल्लक रक्कम तपासण्यापासून ते नॉमिनी जोडण्यापर्यंतच्या सेवांचा समावेश आहे.
सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर तुम्ही मोबाईल नंबर आणि एमपिन टाका. आता तुमचे आधारकार्ड उमंग ॲपशी लिंक करा.
ॲपवर लॉग इन केल्यानंतर, आता तुम्ही ऑल सर्व्हिस विभागात जा. येथे तुम्हाला ईपीएफओचा पर्याय निवडावा लागेल.
ड्रॉप डाऊन मेनूमध्ये, दावा दाखल करा (रेज क्लेम) हा पर्याय निवडा. आता तुम्हांला तुमचा यूएएन नंबर टाकावा लागेल.
यूएएन नंबर टाकल्यानंतर काही वेळाने तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकताच दावा नोंदवला जाईल.
शेवटी तुम्हांला संदर्भ क्रमांक (रेफरेन्स नंबर) दिला जाईल, त्यानंतर तुम्ही क्लेमची स्थिती तपासू शकता.