जबरदस्त! आता OLA मध्ये गुंतवणुकीची भन्नाट संधी; लवकरच IPO येणार, ११ हजार कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:04 PM2021-08-31T15:04:38+5:302021-08-31T15:09:34+5:30

आता वाहतूक सेवा क्षेत्रात मोठी कंपनी असलेली OLA आता IPO आणण्याच्या तयारीत आहे.

आताच्या घडीला शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरू आहे. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय निर्देशांक दोन्ही सर्वोच्च पातळीवर आहेत. गुंतवणूकदारांची यामुळे चांगलीच चांदी झाली असून, अनेकविध कंपन्यांचे उत्तम रिटर्न मिळत आहेत.

कोरोना संकाटाच्या काळात अनेक क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय बंद पडले असले, तरी काही क्षेत्रातील कंपन्यांची धडाक्यात नफावसुली झाली. अनेक कंपन्यांनी सर्वोत्तम रिटर्न्स दिले. गेल्या काही कालावधीपासून अनेकविध बड्या कंपन्यांचे IPO सादर करण्यात येत आहेत.

Zomato नंतर आता वाहतूक सेवा क्षेत्रात मोठी कंपनी असलेली OLA आता IPO आणण्याच्या तयारीत आहे. OLA चा IPO डिसेंबरच्या तिमाहीत ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

IPO साठी OLA सिटी ग्रुप आणि कोटक महिंद्रा बँकेसोबत व्यवस्थापन करत असल्याचे बोलले जात आहे. OLA चे संचालन करणारी एएनआय टेक्नॉलॉजी हा IPO बाजारात आणणार आहे. या आयपीओ व्यवस्थापनात आणखी काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

OLA या IPO च्या माध्यमातून कंपनीने ११ ते १४ हजार ६०० कोटी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ओला डिसेंबरच्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर २०२१) आयपीओसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल करण्याची शक्यता आहे. सन २०११ मध्ये भावीश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी ओलीची सुरुवात केली होती.

OLA आताच्या घडीला भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमध्ये सेवा पुरवते. ओलाने आतापर्यंत ४०० कोटी डॉलर्सचा फंड जमवला असल्याचा अंदाज आहे. ओलाने जुलै २०२१ मध्ये टेमासेक, वारबर्ग पिनकसच्या प्लम वुड इनव्हेस्टमेंट आणि भावीश अग्रवाल यांच्या कंपनीच्या माध्यमातून ३ हजार ७३३ कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केली होती.

कंपनी पुढच्या वर्षी IPO आणण्याच्या तयारीत आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित नाही. OLA च्या आयपीओतून सॉफ्ट बँक, टायगर ग्लोबल आणि स्टीडव्यू कॅपिटल सारख्या गुंतवणूकदारांना कंपनीतील आपला पूर्ण किंवा काही हिस्सा विकण्याची संधी मिळणार आहे, असे सह-संस्थापक भावीश अग्रवाल यांनी सांगितले होते.

कंपनीने मागच्या एका वर्षात आपला व्यवसाय झपाट्याने वाढवला आहे. लॉकडाउनंतर ओलाच्या व्यवसायात सुधारणा झाली आहे. बहुतेक जण सार्वजनिक वाहतुकीपेक्षा वैयक्तिक प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ओलाची स्थिती चांगली आहे, असे भावीश अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, शेअर बाजारात विक्रमी स्तर गाठणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. सेन्सेक्सने १४० अंकांची झेप घेत ५७ हजार अंकांचा टप्पा ओलांडला. निफ्टी १७ हजार अंकाजवळ पोहोचला आहे.

बाजार सुरु होताच गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवला आहे. बँका, आयटी कंपन्या, मेटल, एफएमसीजी , ऑटो या क्षेत्रात गुंतवणूकदार खरेदीला प्राधान्य देत आहेत, असे सांगितले जात आहे.